भिवंडीत वंचित आघाडीची प्रचार सभा; काँग्रेसच्या तंबूत घबराट

भिवंडीत वंचित आघाडीची प्रचार सभा; काँग्रेसच्या तंबूत घबराट

वंचित बहुजन आघाडी (फाईल फोटो)

भिवंडीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे वारे जोमात फिरू लागले आहेत. तीव्र उन्हाच्या झळांमध्ये निवडणूकीचे रण तापू लागले आहे. या निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरूण सावंत यांच्या प्रचारासाठी प्रथमच असदुद्दीन ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर हे भिवंडीत जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या गटात खळबळ माजली आहे. त्यांच्या प्रचार सभेला परवानगी मिळू नये यासाठी काँग्रेस पक्षातील एक गट सक्रिय झाला आहे. मात्र पोलीस नियमानूसार अटी-शर्थी राखून प्रचार सभेला परवानगी देणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

प्रचार सभेसाठी एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष शादाब उस्मानी यांनी कायदेशीर परवानगीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळे स्थानिक काॅंग्रेस पुढाऱ्यांची मोठी गोची झाली आहे. भिवंडी लोकसभा मतदार संघात वंचित बहूजन आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली असून वंचीत आघाडीचे उमेदवार डॉ. अरूण सावंत हे विविध ठिकाणी प्रचार करू लागले आहेत. मुस्लिम समाजासह भारिपचे कार्यकर्ते त्यांच्या पाठिशी उभे आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या प्रचाराला मोठी खीळ बसली आहे. एमआयएम पक्षाची भिवंडी पूर्व, भिवंडी पश्चिम आणि कल्याण पश्चिम या विधानसभा मतदारसंघात चांगली पकड आहे. बहुतांश मुस्लिम समाज हा काँग्रेसपेक्षा एमआयएम पक्षाला समर्थन देणार आहे. त्यामुळे हक्काची मते मिळविण्यासाठी असदुद्दीन ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर हे येत्या २६ एप्रिल रोजी भिवंडीतील धोबीतलाव येथील स्व. परशुराम टावरे क्रिडा संकुल येथील मैदानात जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे मुस्लिम समाजात उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या जाहीर सभेमुळे समाजवादी पक्षासह काँग्रेस पक्षाला जोरदार फटका बसण्याची शक्यता राजकीय वर्तूळात बोलले जात आहे. त्यामुळे असुउद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भिवंडीतील जाहीर सभेकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

First Published on: April 24, 2019 4:36 PM
Exit mobile version