रायगडात गिधाडांचे अस्तित्त्व टिकून !

रायगडात गिधाडांचे अस्तित्त्व टिकून !

गिधाड

अनेक ठिकाणी दुर्मिळ होत चाललेल्या, मात्र पर्यावरण मित्र अशी ओळख असलेल्या गिधाडांविषयी जनसामान्यांमध्ये जागृती होऊन त्यांचे महत्त्व समजावे याकरीता सप्टेंबर महिन्याचा पहिला शनिवार आंतरराष्ट्रीय गिधाड संवर्धन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचे औचित्य साधून येथील गिधाड संवर्धनामध्ये विशेष कार्य करणार्‍या सीस्केप आणि स्थानिक वन विभागातर्फे तालुक्यातील नाणेमाची येथे गिधाड निरीक्षणाकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रायगडमध्ये गिधाडांचे अस्तित्त्व टिकून असल्याची सुवार्ताही यानिमित्ताने पुढे आली आहे.

परिसरातील गावांत सीस्केप (सोसायटी ऑफ इको टेंडेंजर्ड पेसिज काँझर्व्हेशन प्रोटेक्शन) च्या सदस्यांनी गिधाड संवर्धनाबाबत स्थानिक ग्रामस्थांना माहिती देऊन जनजागृती केली. यावेळी सागर मेस्त्री यांनी माहिती देताना तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागांमध्ये आजही गिधाडांचे वास्तव्य आढळून येत असल्याचे सांगितले. शिवाय याच तालुक्यातील वाकी, नाणेमाची, शिवथरघळ, किल्ले रायगड या पर्वतरांगामध्ये उंच डोंगर कपारींमध्ये लांब चोचीची ३ हजार गिधाडे वास्तव्यास आहेत. जंगलामध्ये उंच झाडावर काड्यांची घरटी तयार करुन वास्तव्य करणारी पांढर्‍या पाठीची गिधाडेदेखील आढळून येत आहेत.

भारतीय उपखंडामध्ये सापडणार्‍या ९ प्रजातींपैकी पांढर्‍या पाठीची गिधाडे, लांब चोचीची गिधाडे आणि राज गिधाडे (आता ही गिधाडे दिसत नाहीत) यांचे वास्तव्य रायगड जिल्ह्यांत असल्याचे आढळून आले आहे. किल्ले रायगडाच्या परिसरांमध्ये इतर गिधाडे स्थलांतरीत होऊन आलेली दिसून येतात. यामध्ये राजस्थान, गुजराम, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पूर्वांचल आणि बंगाल येथून स्थलांतर केलेली गिधाडे दिसून येत असल्याचे मेस्त्री म्हणाले.

सीस्केप संस्थेची स्थापना सन २००० मध्ये करण्यात आल्यानंतर संशोधनाला सुरूवात करण्यात आली आणि त्यामुळेच रायगड जिल्ह्यात गिधाडांचे अस्तित्व टिकून असल्याचे मेस्त्री यांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील चिरगाव, भापट, श्रीवर्धन, नाणेमाची, वडघर, वाळण इत्यादी गावांमध्ये गिधाडांचे अस्तित्व टिकून असल्यामुळे त्यांचा उल्लेख करणे आवश्यक आहे, असे सरपंच सुधीर महामुणकर यांनी सांगितले.

First Published on: September 10, 2019 5:56 AM
Exit mobile version