नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

नवाब मलिकांचा पाय आणखी खोलात; अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत. मात्र त्यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशिम कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. एनसीबीचे मुंबई झोनलचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे.

या प्रकरणामुळे आता नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. समीन वानखेडे यांनी स्वत: २४ ऑगस्ट रोजी वाशीम कोर्टात जाऊन याचिका दाखल केली होती, त्यावर आज सुनावणी पार पडली, यावेळी कोर्टाने मलिक यांचा जामिन अर्जदेखील फेटाळला आहे.

एनसीबी मुंबई झोनलचे संचालक समीर वानखे़डे यांच्या कुटुंबियांची बदनामी केल्याप्रकरणी नवाब मलिक यांच्याविरोधात वाशिम सत्र न्यायालयाने अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नबाव मलिक यांच्याविरोधात उद्या वाशिम शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल.

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे मुंबई झोनलचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी कारवाई करत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केली. या प्रकरणावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकरणावरून नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंविरोधात अनेक गंभीर आरोप केले होते.

समीर वानखेडे यांच्या वैयक्तिक आयुष्यातील जुने फोटो आणि पुरावे मलिक यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. यात वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचाही फोटो होता. तसेच मलिक यांनी वानखेडेंच्या जातीचे कागदपत्रंही समोर आणली, तसेच ती कागदपत्रे खोटी असल्याचे सांगत वानखेडेंनी या खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवल्याचा गंभीर आरोप केला होता. ज्यावरून वानखेडेंनी मलिक यांच्याविरोधात अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल केलीय. ज्यानुसार कोर्टाने आता सीआरपीसीच्या कलम १५६(३) नुसार या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले.


मुख्यमंत्री घरी-मंत्रालयात नसतात, पण वेळ मिळाल्यावर गुवाहाटीला जातात; सुषमा अंधारेंचा षटकार


First Published on: November 16, 2022 1:02 PM
Exit mobile version