दिलासादायक! सततच्या पावसामुळे राज्यातील धरणांत ३२ टक्के जलसाठा

दिलासादायक! सततच्या पावसामुळे राज्यातील धरणांत ३२ टक्के जलसाठा

राज्याच्या अनेक जिल्ह्यांत पावसाची संततधार कायम आहे. तसेच, धरणक्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे आता राज्यावरील पाणीसंकट दुर झाले आहे. जून अखेरपर्यंत पावसाने हवीतशी हजेरी लावली नव्हती. त्यामुळे राज्यात जलसंकट उभे राहिले होते. ३० जिल्ह्यांमध्ये पाणीपुरवठ्याचे संकट ओढावले होते. परंतु, मागील १० दिवसांतील पावसामुळे राज्यावरील जलसंकट दूर झाले आहे. (water storage increased in dam who supply water to Maharashtra)

धरण क्षेत्रात पावसाची दमदार हजेरी

मागील १० दिवसांत राज्यातील धरण क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे जलसाठ्यात ३२ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तसेच, गतवर्षीच्या तुलनेत तो ५ टक्क्यांनी जास्त आहे. सध्या विदर्भात पावसाने थैमान घातले असून, राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे.

पावसाची टक्केवारीही सरासरीच्या पुढे

कोकण विभागातील सर्व जिल्हे, मुंबई, ठाणे आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सुरू झाला. गेल्या तीन-चार दिवसांत उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील पावसाची टक्केवारीही सरासरीच्या पुढे गेली आहे. परिणामी, धरणांतील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे.

कोकणासह संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यासह मध्य भारतात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच मुंबई, ठाणे, कोकणासह मध्य महाराष्ट्र व विदर्भात अतिवृष्टीचा, तर मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

१४ जुलैपर्यंत धोक्याचा इशारा

राज्यात पालघर, नाशिक, पुणे या जिल्ह्यांसाठी १४ जुलैपर्यंत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांतील काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मुंबईत पुढील २ दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, १२ जुलै रोजी पूर्व मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.


हेही वाचा – राज्यातील पूर परिस्थितीमुळे मनसेचा उद्याचा मेळावा पुढे ढकलला, राज ठाकरेंचा निर्णय

First Published on: July 12, 2022 12:59 PM
Exit mobile version