आम्ही कोणावरही खोटे गुन्हे दाखल करत नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

आम्ही कोणावरही खोटे गुन्हे दाखल करत नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

संग्रहित छायाचित्र

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – महाविकास आघाडीच्या काळात चुकीचे गुन्हे दाखल केल्याचा दावा करत आमच्या काळात आम्ही कोणावरही खोटे गुन्हे लावलेले नाहीत, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी केला. मॉलमध्ये जाऊन मारहाण केल्यावर गुन्हा दाखल होणारच ना, असा टोलाही त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांवर लगावला.

गृहविभागाची परिस्थिती वाईट होती. महाविकास आघाडीच्या काळात साधु हत्याकांड, रिटायर्ड ऑफिसरला मारहाण, जळीतकांड, हिंगणघाट, संभाजीनगरमधील दुर्दैवी घटना, साकीनाक्यातील घटना, शर्जिल उस्मान, मनसुख हिरने, असे प्रकार घडले. यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले. तसंच, त्यांच्या काळात तक्रारींची दखल घेतली जात नव्हती. आपल्या काळात तक्रारींची दखल घेतली जाते. गुन्हा नोंदवला जातो. तपास केला जातो. गुन्हेगाराला आळा घालण्याचं काम सरकार करतंय, असं एकनाथ शिंदे म्हणाले.


गृहविभागाची माहिती देत असतानाच एकनाथ शिंदे म्हणाले की, आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला जातो. पण तुम्ही मॉलमध्ये जाऊन माणसाला माराल तर कसं होईल, असा टोलाही त्यांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला. यावेळी सभागृहात एकच गोंधळ झाला. नेमकं त्याचवेळी जितेंद्र आव्हाड सभागृहात आले. त्यामुळे गुन्हेगारांना शासन करू म्हटल्यावर जितेंद्र का आत आले? असा मिश्किल सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

महाविकास आघाडीच्या काळात खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढलं होतं. आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्यावर गुन्हे दाखल केले. अभिनेत्री कंगना राणावतचं घर तोडलं, गिरीश महाजन आणि नारायण राणे यांच्यावर मोक्का लावण्याचे निर्देश देण्यात आले होते. एवढंच नव्हे तर, देवेंद्र फडणवीसांच्या कुटुंबाची चौकशीही सुरू करण्यात येणार होती, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

First Published on: March 3, 2023 3:43 PM
Exit mobile version