राज्यासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे, कोकण, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

राज्यासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे, कोकण, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा

राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत असताना अचानक काही जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणासह अनेक राज्यांना पावसाने झोडपले आहे. यात पुढील काही दिवसांत काही जिल्ह्यात पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात वादळी प्रभाव वाढत असल्याने राज्यात पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ पूर्व मध्य अरबी समुद्रावर वादळीस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यात किमान तापमान वाढले आहे.

यामुळे आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावासाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे, अशा परिस्थितीत सोमवार आणि मंगळवारी राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी आज पावसाचा इशारा दिला आहे. पावसाळी वातावरण निवळताच पुढील 2 दिवसात किमान तापमान 2 ते 4 अंशाने घटेल असी शक्यता वर्तवली जात आहे.

ऐन हिवाळ्यात कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. यात पुढील 48 तासांमध्ये महाराष्ट्रात काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसला आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान आज महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकपर्यंत पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. पश्चिम विदर्भासह अमरावती जिल्ह्यात वातावरण कोरडे राहणार असून पुढील पाच दिवस किमान तापमानात २-३℃ ने वाढ होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर मुंबई, ठाणे, कोकणातही पुढील काही दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे.


भारत-चीन सीमावादावर राजकारण बंद करा; अमित शाह काँग्रेसवर भडकले

First Published on: December 13, 2022 1:27 PM
Exit mobile version