मराठवाड्यासह, सांगली, कोल्हापूरमध्ये येत्या ३ दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

मराठवाड्यासह, सांगली, कोल्हापूरमध्ये येत्या ३ दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

राज्यात पुढील ३ दिवस विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत विजेंच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात गेल्या काहिदिवसांपासून उकाडा वाढला आहे. नाशिकमध्ये उष्माघात वाढला असल्याने काही नागरिकांचा भोवळ येऊन मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. पुन्हा अकाळी पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांना काही अंशी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. परंतु बागायतदार शेतकऱ्यांना या अवकाळी पावसामुळे पुन्हा आस्मानी संकट आले आहे. हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरद्वारे पुढील ३ दिवस राज्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.

हवामान खात्याचे तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,  नाशिक,पुणे,अहमदनगर,सांगली,सातारा,कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद,नांदेड, हिंगोली आणि रायगड भागात पावसाची शक्याता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यामध्ये पुढील ३ ते ४ तासात पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अहमदनगर शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अहमदनगर जिल्ह्यासह काही भागांत विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या आहेत. या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोड्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. बागायतदार शेतकऱ्यांना अचानक आलेल्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा काढणी सध्या थांबवले आहे.

First Published on: April 13, 2021 4:44 PM
Exit mobile version