मुंबईकर गारठले! गेल्या चार दिवसांत पारा 16 अंशावर; राज्यातही गुलाबी थंडी

मुंबईकर गारठले! गेल्या चार दिवसांत पारा 16 अंशावर; राज्यातही गुलाबी थंडी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढतोय. उत्तर भारताच्या टोकावर हिमवृष्टी वाढण्याची शक्यता असून या हिमवृष्टीमुळे गार वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे वेगाने वाहण्याचा अंदाज आहे. या थंड वाऱ्यांमुळे मध्य भारतासह उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात आणखी घट होईल, परिणामी सर्वत्र गारठा वाढेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईत किमान तापमान घसरत असून गुरुवारी तापमान 16 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले होते, त्यामुळे मुंबईकरांना काही वेळ का होईना थंड गारवा अनुभवता आला.

पुढील काही दिवस मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आल्हाददायक वातावरण अनुभवता येणार आहे. यात मुंबईचे किमान तापमान 13 ते 14 अंशांच्या आसपास पोहचू शकते. या मुख्यत: मुंबई उपनगरातील बोरिवली नॅशनल पार्क ते ठाणे परिसरात किमान तापमान रात्री 11 ते 12 अंशाच्या आसपास नोंदवले जाईल, आणि दिवसा कमाल तापमान 28 अशांच्या आसपास राहील.

वाहनं सावकाश चालवा! महामार्गावर धुक्याची चादर

मागील काही दिवसांपासून वाढत्या थंडीमुळे सकाळी अनेक महामार्गांवर दाट धुक्याची चादर पसरलेली दिसतेय. यामुळे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील वाहतूक अतिशय धीम्या गतीने सुरु आहे. असे असतानाही पर्यटक आणि प्रवासी या आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटत आहेत.

मुंबई- गोवा, मुंबई -बंगळूर, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग तसेच मुख्य शहरांना व गावांना जोडणारे राज्य मार्गही तापमानाचा पारा घसरला असून पहाटेच्या वेळी दाट धुक्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमान कमी होत असल्याने चालकांना रस्ता आणि समोरील वाहनं नीट दिसत नाही, ज्यामुळे वाहतूक संथगतीने सुरु आहे. परिणामी काही ठिकाणी सकाळच्या वेळी वाहतूक कोंडी झाल्‍याचे दिसले.


हेही वाचा : माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं निधन, वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


First Published on: January 13, 2023 7:53 AM
Exit mobile version