अणुस्कुरा घाटाचे लवकरच रुंदीकरण, अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

अणुस्कुरा घाटाचे लवकरच रुंदीकरण, अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूद

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – कोल्हापुरातून रत्नागिरीत येण्यासाठी अतिमहत्त्वाचा ठरणाऱ्या अणुस्कुरा घाटाची दुरवस्था झाली आहे. या घाटावरून जड वाहनांची वाहतूक वाढल्याने रस्त्यांवर भलेमोठे खड्डे पडले आहेत, परिणामी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे, या रस्त्याचे लवकरच मजबुतीकरण, डांबरीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिली.

जुलै २०२१ मध्ये अतिवृष्टी झाल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा घाट बंद आहे. त्यामुळे ती वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गे वळवण्यात आली आहे. यामुळे कोल्हापूरला कोकणाशी जोडणाऱ्या या अतिवळणाच्या घाटाची दुरवस्था झाली. गेल्या कित्येत वर्षांत या रस्त्याची डागडुजी झाली नसल्याने रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडले आहेत. तसंच, काही ठिकाणी हा घाट अरुंद असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या घाटाचे मजबुतीकरण, डांबरीकरण आणि रुंदीकरण करावे, त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी, अशी मागणी आज लांजा-साखरपा-राजापूर मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी विधानसभेत केली.

ओणी ते अणुस्कुरा हा ३५ किमीचा रस्ता आहे. या मार्गावर ११ किमीपर्यंत रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे. तर, १४ किमीपर्यंतचा रस्ता सुस्थितीत आहे. परंतु, उर्वरित १० किमी रस्त्याची वाईट परिस्थिती आहे. कोकणातील सर्व रस्ते चांगले होण्याकरता जे काम हाती घेण्यात आले आहे, त्या माध्यमातून अणुस्कुरा घाटातही रुंदीकरण व्हावे, अशी मागणी राजन साळवी यांनी केली.

“कोल्हापुरातून कोकणाला जोडणाऱ्या या ३५ किमीच्या रस्त्याला फार महत्त्व आहे. आंबा घाट बंद झाल्याने अणुस्कुरा घाटातून वाहतूक होत होती. या मार्गावरून जड वाहतूक झाली. त्यामुळे मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. पाऊस आणि वातावरण लक्षात घेता येथील रस्ता तातडीने करणं आवश्यक आहे. ११ किमीचा रस्ता चांगला करण्यासाठी काम सुरू झालं आहे. राजन साळवींसह तेथील अनेक प्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत समस्या मांडलेली आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने होणे गरजेचे आहे. परंतु, रस्त्याच्या कामासाठी निधीचा अभाव होता. म्हणून येणाऱ्या अर्थसंकल्पातून या रस्त्यासाठी १० कोटींचा निधी मिळणे अपेक्षित आहे. हा निधी या बजेटमधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरच होणार आहे,” असं आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलं आहे. त्यामुळे जीवघेण्या ठरलेल्या अणुस्कुरा घाटाची परिस्थिती आता लवकरच सुधारणार आहे.

First Published on: March 2, 2023 12:13 PM
Exit mobile version