भाजपाविरोधात बोलणाऱ्या कलाकारांना मालिकेतून काढणार का ? अतुल लोंढेंचा सवाल

भाजपाविरोधात बोलणाऱ्या कलाकारांना मालिकेतून काढणार का ? अतुल लोंढेंचा सवाल

Modi government is aware of inflation only because of the fear of defeat Atul Londhe

अभिनेते किरण माने यांनी त्यांचे विचार समाज माध्यमावर व्यक्त करून कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांचे विचार मांडण्याचा अधिकार त्यांना संविधानाने दिलेला आहे. सरकारच्याविरोधात मत व्यक्त केले म्हणून त्या कलाकाराला मालिकेतून काढून टाकणार का? असा संतप्त सवाल विचारत, महाराष्ट्र हे कधीच खपवून घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, अभिनेते किरण माने यांच्याबाबतीत जो प्रकार घडला तो बंद झाला पाहिजे. महाराष्ट्रात असली दडपशाही चालू दिली जाणार नाही. संविधानाच्या चौकटीत आपले मत व्यक्त करण्याचा प्रत्येक व्यक्तीला अधिकार आहे. एखादी विचारसरणी लादण्यासाठी पोटावर पाय मारण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात केला जात असेल तर काँग्रेस पक्ष तो कधीही खपवून घेणार नाही. काँग्रेस पक्ष किरण माने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

पुरोगामी महाराष्ट्राला एक समृद्ध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आहे. यापूर्वीही विविध कलाकारांनी राजकीय वक्तव्ये केली, सरकारविरोधात भूमिका घेतली पण म्हणून काही त्यांना चित्रपट किंवा मालिकेतून काढले नाही. किरण माने यांनी व्यक्त केलेल्या मतांशी तुम्ही सहमत नाही म्हणजे त्यांच्या पोटावर पाय देणार का? आरएसएस विचाराची ही दडपशाही महाराष्ट्रात चालणार नाही. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशा विभाजनवादी विचारांना थारा नाही.

भाजपा सरकारविरोधात समाज माध्यमावर मत व्यक्त केले म्हणून ‘स्टार प्रवाह’ या खाजगी वाहिनीने किरण माने या कलाकाराला ‘मुलगी झाली हो’, या मालिकेतून काढण्यात आले हे अत्यंत निषेधार्ह असून ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीने केलेल्या या चुकीबद्दल जाहीर माफी मागितली पाहिजे, असे लोंढे म्हणाले.


हेही वाचा – Kiran Mane : इंदिरा गांधींवर टीका करायचो, पण तेव्हा अशी दहशत नव्हती, किरण मानेंचा संताप


 

First Published on: January 14, 2022 4:30 PM
Exit mobile version