राज्यातील सर्व शाळा उघडण्याची तयारी सुरु

राज्यातील सर्व शाळा उघडण्याची तयारी सुरु

प्रातिनिधिक छायाचित्र

दिवाळीपूर्वी शाळा सुरू करण्यात येऊ नये अशी मागणी पालकांकडून करण्यात येत असली तरी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या हालचाली शिक्षण उपसंचालक कार्यालयाबरोबरच मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने सुरू केल्या आहेत. त्यानुसार शाळांच्या इमारतींचे निर्जंतुकीकरण करणे, साफसफाई करण्याचे आदेश शिक्षणाधिकार्‍यांकडून सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे 21 सप्टेंबरपासून नववी व दहावीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कंटेन्मेट झोनमध्ये नसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना ऑनलाईन शिक्षण, टेलि कौन्सिलिंग आणि अन्य कामासाठी 21 सप्टेंबरपर्यंत शाळेत बोलावण्यात यावे. त्याचप्रमाणे कंटेन्मेट झोनमध्ये नसलेल्या परिसरातील शाळा 21 सप्टेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य सरकारना दिले होते. शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवण्यात आला असला तरी शाळा सुरू करण्यासंदर्भातील एखादी तारीख जाहीर करणे आवश्यक असल्याने केंद्र सरकारने 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयासह मुंबई महापालिकेने 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

महापालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळेत साफसफाई करणे, बाके, वर्ग, पायर्‍या, इमारती यांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पालिकेच्या शाळेतील मुख्याध्यापकांकडून कामाला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 21 सप्टेंबरपासून सुरू करण्याचे आदेश दिले असले तरी शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकारचे निर्देश येणे आवश्यक आहे. मात्र राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याही सूचना आल्या नाहीत. त्यामुळे राज्य सरकारचे निर्देश आल्याशिवाय शाळा सुरू करता येणार नसल्याचेही पालकर यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडूनही राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना 21 सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात तोंडी सूचना दिल्या आहेत. मात्र राज्य सरकारकडून कोणतीही सूचना न आल्याने शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणार्‍या 27 वस्तू व तांदळाचे वाटप करण्यासाठी पालकांना बोलावण्यात येत आहे. त्यामुळे शाळांची स्वच्छता ठेवण्यात येत आहे; पण शाळा सुरू करायच्या झाल्यास इमारतींचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असल्याने त्या दृष्टीकोनातून मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

First Published on: September 11, 2020 7:06 AM
Exit mobile version