धक्कादायक: स्वतःची चिता रचून शेतकरी महिलेनी केली आत्महत्या

धक्कादायक: स्वतःची चिता रचून शेतकरी महिलेनी केली आत्महत्या

आशा इंगळे यांनी गोठ्यात स्वतःचे सरण रचले

सरकार शेतकऱ्यांसाठी कितीही योजना आखत असल्याची वल्गना करत असले तरी वास्तवात परिस्थिती किती गंभीर आहे, याची प्रचिती बुलडाण्यातील एका दुर्दैवी प्रकारामुळे समोर आली आहे. नापिकी, कर्जबाजारीपण याला कंटाळून बुलडाणाच्या धोत्रा भनगोजी या गावातील माजी महिला सरपंच आशा इंगळे यांनी स्वतःची चिता रचून आत्महत्या केली आहे. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना बुधवारी घडली असल्याची माहिती मिळत आहे. आशा ५५ वर्षांच्या होत्या. त्यांची दोन मुले रोजंदारीवर काम करत असून एका मुलीचे लग्न झालेले आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ८० ते ९० हजार रुपयांचे कर्ज आहे. तसेच सावकाराचे थोडे कर्ज होते. थकबाकी फेडण्यासाठी कर्जदार तगादा लावत असल्यामुळे माजी आई तणावाखाली होती, अशी प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली आहे. हा मुलगा चिखली तालुक्याच्या ठिकाणी शाळेवर कंत्राटी स्वरुपात काम करत आहे. साडे तीन एकर शेती असूनही सततच्या नापिकीमुळे काहीच उत्पन्न येत नव्हते, असेही तो म्हणाला.

आशा इंगळे यांच्या दिराने सांगितले की, “साडे तीन एकरात फक्त दहा पोती सोयाबीनचे उत्पन्न झाले होते. मुलाचेही उत्पन्न फारसे नव्हते. त्यामुळे आशाताई खुप तणावात होत्या आणि त्यातूनच त्यांनी रात्री स्वतःचे सरण रचून आत्महत्या केली. आमच्या गावातील तीन महिन्यातली ही दुसरी घटना आहे.”

आशा इंगळे यांच्या पतीचे २००८ मध्ये निधन झाले होते. दोन्ही मुले रोजंदारीवर असल्यामुळे त्या एकट्याच शेती बघत होत्या. सरकारने जरी काही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असला तरी नापिकी आणि कर्जामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

First Published on: November 16, 2018 12:17 PM
Exit mobile version