महिला बचत गटांच्या मेहनतीला उत्तम मार्केटिंगची जोड हवी!

महिला बचत गटांच्या मेहनतीला उत्तम मार्केटिंगची जोड हवी!

महिला बचत गट कार्यक्रम

महिला बचत गटांकडून राज्य सरकारला अपेक्षित असलेले उद्दिष्ट महिला आर्थिक विकास महामंडळाने योग्यरीत्या खेडोपाडी राबवण्यात यश मिळवले आहे. राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये महिलांना एका छताखाली आणण्यात यश आले आहे.पण, महिला बचत गटांकडून करण्यात येणार्‍या मेहनतीला उत्तम मार्केटिंगची जोड मिळायला हवी. त्यासाठीच प्रत्येक महिलेने आपल्या बचत गटापासून सुरूवात करायला हवी, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळा (माविम)च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी केले. आपलं महानगर आणि माय महानगरच्या वतीने आयोजित केलेल्या ‘गाथा यशस्विनींची, महिला बचतगटांची’ या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे केले होते. त्यावेळी त्यांनी वरील मनोगत व्यक्त केले. महिला सक्षमीकरणासाठी आगामी काळात राज्य सरकारला वेगवेगळ्या योजना राबविण्याची गरजच भासणार नाही, असे महिला सक्षमतेचे बीज रोवण्याची गरज आहे आणि प्रत्येक वेळी सरकार सर्व करेल, असे समजण्याची गरज नाही. महिलांनी एकत्र येऊन समृद्ध होण्याच्या दिशेने पाऊल टाकायला हवे.

‘आपल महानगर’ या वृत्तपत्राने महिलांना आपला आवाज, आतला आवाज व्यक्त करण्याची संधी दिली. ‘गाथा यशस्विनींची, महिला बचत गटांची’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांना व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले. पण या कार्यक्रमाच्या संधीचे आगामी कालावधीत राज्यस्तरीय परिषदेत रूपांतर व्हावे, अशी इच्छा ठाकरे यांनी व्यक्त केली.

व्यासपीठ कुठलेही असो ते आणि महिला यांच्यातील अंतरही कमी व्हायला हवे. पालघरच्या तलासरीचे उदाहरण ठाकरे यांनी यावेळी दिले. तलासरी म्हणजे गुजरातच्या टोकावरचा भाग. या भागात ६ केंद्र महिला बचत गटाकडून चालवण्याची सुरुवात झाली. पण पावसाळ्यात मात्र शेतीच्या दिवसामध्ये बचत गटांच्या महिलांनी केंद्र बंद ठेवले. पण या ठिकाणच्या केंद्रातील तयार होणार्‍या वस्तू या सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी मार्केटिंगसाठी घेतल्या. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या महिलांना शेतात मजुरी करावी लागली नाही. उलट या महिलांनी शेतात दोन मजूर ठेवून केंद्र चालू ठेवले. अशा पद्धतीचे सक्षमीकरण व्हायला हवे. आज ज्यांचा सत्कार झाला आहे त्यांचं कौतुक आहेच. पण ज्यांचे कौतुक झाले नाही त्यांनी आजच्या कार्यक्रमातून एक वेगळी स्फुर्ती आणि धग मनातून घेऊन जाणे गरजेचे आहे, असा संदेशही ठाकरे यांनी महिलांना दिला.

सरकारी यंत्रणा जर झोपेचं सोंग आणत असेल तर अशा यंत्रणेला खडबडून जागे करण्याचे काम हे ‘आपल महानगर’सारख्या वृत्तपत्राची जबाबदारी आहे, असे मत ‘आपलं महानगर’ वृत्तपत्राचे संपादक संजय सावंत यांनी मांडले. चांगले काम करणार्‍या महिलांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी तसेच महिला बचत गटांसमोरील आव्हाने, अडचणीही सरकार दरबारी पोहचवण्याचे काम ‘आपलं महानगर’ यापुढे नक्कीच करेल, असाही विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. अनेकदा शहरी समस्यांवर ‘आपलं महानगर’कडून कव्हरेज होते; पण ग्रामीण भागातील महिलांशी जोडून घेण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली याचा आत्मिक आनंद मिळाला, असेही ते म्हणाले.

बिकट परिस्थितीत वाट काढणार्‍या यशस्वी महिलांचा यावेळी सत्कारही करण्यात आला. टाकाऊमधून टिकाऊ श्रमदान बचत गटाच्या प्रणिता अधिकारी, ठाण्यात १५ महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणार्‍या प्रतिभा इरकशेट्टी, नाशिक जिल्हा महिला विकास सोसायटीच्या संस्थापक आणि अध्यक्षा अश्विनी बोरस्ते, अलिबागमध्ये सहकारी तत्वावर रेशनिंग दुकान सुरू करणार्‍या अमृता ठोंबरे, आम्ही उद्योजिका संस्थेच्या आशा मामिडी आणि येवला ते मुंबई असा प्रवास करून लग्नानंतरही शिक्षण घेणार्‍या शालिनी गायकवाड अशा यशस्विनींचा सत्कार स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला.

डिक्की संस्थेच्या अध्यक्षा आणि उद्योजिका ज्योती उबाळे यांनी अतिशय महत्त्वाच्या अशा आर्थिक बाबींवर महिलांना मार्गदर्शन केले. तर पश्चिम उपनगर महिला सहकारी फेडरेशनच्या संजना घाडी यांनी बचत गटांच्या माध्यमातून धडपड करणार्‍या महिला उद्योजकांना व्यक्त होण्याची संधी दिल्याबद्द ‘आपलं महानगर’चे कौतुक केले. यावेळी ‘आपलं महानगर’’चे कार्यकारी संपादक संजय परब यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागची भूमिका मांडली. ‘आपलं महानगर’चे प्रतिनिधी प्रवीण वडनेरे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. भाग्यश्री भुवड यांनी यशस्विनींची मुलाखत घेतली आणि प्रवीण पुरो यांनी आभार मानले.

First Published on: August 20, 2019 6:34 AM
Exit mobile version