इतिहासाची मांडणी करताना समाजभान जपायला हवं, लेखिका अरुणा ढेरेंचे प्रतिपादन

इतिहासाची मांडणी करताना समाजभान जपायला हवं, लेखिका अरुणा ढेरेंचे प्रतिपादन

धुळे शहरातील स्त्री शिक्षण संस्था संचलित कमलाबाई कन्या हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अरुणा ढेरे यांनी विविध विषयांवर माध्यमांशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर प्रदर्शित झालेल्या चित्रपटावर आणि इतिहासावर देखील त्यांनी आपली भूमिका मांडली.

कलेच्या माध्यमातून इतिहासाची मांडणी ही संदर्भ सोडून केली जात आहे. इतिहासाची मांडणी करताना समाजभान जपायला हवं. कशासाठी आपण हे करीत आहोत, त्याच्या मागच्या प्रेरणा वेगळ्या असतील तर इतिहासाला वेगळं वळण लागू शकतं आणि समाजावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं प्रतिपादन लेखिका अरुणा ढेरे यांनी केलं.

महाराष्ट्र हा पुरोगामी विचारवंतांचा महाराष्ट्र आहे. पुरोगामी विचार महाराष्ट्रात रुजला आहे. पण तो सर्वसामान्य माणसांच्या विचारांमधून व्यक्त होत नाही हे दुर्दैव आहे. पक्षीय राजकारण आणि जात या पलीकडे जाऊन या माणसांनी आपल्याला काय दिलं आणि ज्ञानाचं क्षेत्र, समाज धारणेचं क्षेत्र हे यांनी किती मोठं केलं याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असंही अरुणा ढेरे म्हणाल्या.

अरुणा ढेरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. राजकारण्यांकडून काही अपेक्षा करावी असं वातावरण राहिलेलं नाही. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने इतका गोंधळ आणि अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण झालेले आहेत. आपल्या हातात काहीच नाही अशा प्रकारची हताश भावना सर्वसामान्य माणसाच्या मनात आहे, असंही ढेरे म्हणाल्या.


हेही वाचा : खडसेंच्या मुलाची आत्महत्या की हत्या?, गिरीश महाजनांचा सवाल


 

First Published on: November 21, 2022 8:26 PM
Exit mobile version