चाकरमान्यांना एसटीने जाता येणार कोकणात

चाकरमान्यांना एसटीने जाता येणार कोकणात

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाऊ इच्छिणार्‍या चाकरमान्यांना ठाकरे सरकारने खुशखबर दिली आहे. नियमांचे पालन करुन भक्तांना एसटीने गणेशोत्सवात कोकणात जाता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.

कोकणात गणेशोत्सवानिमित्त गावी जाऊ इच्छिणार्‍या चाकरमान्यांना अटी आणि शर्तीसह एसटीने प्रवास करणे शक्य असल्याचे अनिल परब यांनी सांगितले. एसटीची सेवा तर उपलब्ध होईलच. त्यामुळे लोकांना एसटी उपलब्ध करून द्याव्या लागतील. पण अटी शर्थींची पूर्तता करुन हे सर्व करावं लागेल. कोकणात गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार असेही ते म्हणाले.

मुंबई आणि एमएमआर क्षेत्र, पुणे या भागातून येणार्‍या चाकरमान्यांना कोकणात जाता यावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेणारी यंत्रणा सक्षम केली जात आहे. आयसीएमआर, आरोग्य विभागाकडून आम्ही गाईडलाईन्स मागवल्या आहेत. राज्य सरकार त्याविषयी अधिक माहिती घेत आहे असे अनिल परब यांनी सांगितले.

यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना कोकणात प्रवेश दिला जाणार का, असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी कोकणात गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही, असे स्पष्टीकरण आधीच दिले होते.

चाकरमानी आणि गणेशोत्सव हे एक समीकरण आहे. कोकणात येणार्‍या चाकरमान्यांना कोणतीही बंदी नाही. तसेच जिल्हा प्रशासनाचे वृत्त हा अंतिम निर्णय नसल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली. मात्र कोकणात ज्या ठिकाणाहून चाकरमानी येणार आहेत, त्याच ठिकाणी त्यांची कोविड चाचणी माफक दरात करावी, अशी मागणी शासनाकडे करणार असल्याचे विनायक राऊत म्हणाले होते. तर दुसरीकडे गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातली, तर आम्ही आंदोलन करु, असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला आहे.

First Published on: July 21, 2020 6:52 AM
Exit mobile version