…तर सांगितले असते ५० खोके तिकडेही पाठवा अन् प्रकल्प आपल्याकडे आणा, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

…तर सांगितले असते ५० खोके तिकडेही पाठवा अन् प्रकल्प आपल्याकडे आणा, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

पुणे – फॉक्सकॉन- वेदांता सेमीकंडक्टर हा दीड लाख कोटींचा प्रकल्प राज्यातून गुजरातला गेला. यावर आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात पुण्यातील तळेगावमध्ये जनआक्रोश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी तळेगावमध्ये सरकारवर टीका केली.

वेदांता-फॉक्सकॉनला आपल्या महाविकास आघाडी सरकारने 10 हजार कोटींची सबसिडी देण्याचे नियोजन केले होते. 1200 एकर जागा देणार होतो. मात्र, तरी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प वीज आणि पाणी नाही तिथे गेलाच कास?, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी यावेळी विचारला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर खोके सरकार म्हणून टीका केली.

गुजरातच्या उद्योगमंत्र्यांनी चांगलं काम केले. मी गुजरात किंवा केंद्र सरकारला दोष देणार नाही. मात्र, दोष खोके सरकारचा आहे. तळेगावमध्ये काहीही कमी नाही. सर्वकाही असून प्रकल्प तिकडे गुजरातला गेला. मुख्यमंत्री शिंदेंना काहीच माहित नव्हते. त्यांना वेदांता-फॉक्सकॉन काय हेच कळत नव्हते. त्यांनी मला विचारले असते, तर मी त्यांनी सांगितले असते की, ५० खोके तिकडेही पाठवा अन् प्रकल्प आपल्याकडे आणा, असा टोला आदित्य ठाकरे यानी मुख्यमंत्र्यांना लगावला.

…तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले असते –

दरम्यान ज्याप्रमाणे सत्तांतर करण्यासाठी आमदारांनी गुजरात, गुवाहटी आणि गोवा असा प्रवास केला, त्याचप्रमाणे आता वेदांता प्रोजेक्टही महाराष्ट्रामध्ये आणला जाणार का? असा सवाल आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारला केला. तेवढी तत्परता प्रोजेक्टबाबत दाखवली असती तर बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले असते असे आदित्य ठाकरे म्हणाले.

First Published on: September 24, 2022 6:16 PM
Exit mobile version