ZP and Panchayat Samiti Election : जनतेनं आम्हाला समाधानकारक निकाल दिलाय – अजित पवार

ZP and Panchayat Samiti Election : जनतेनं आम्हाला समाधानकारक निकाल दिलाय – अजित पवार

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत जनतेनं आम्हाला समाधानकारक निकाल दिलाय, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आम्ही खूप आनंदी पण नाही, अन् दु:खी पण नाही, समाधानकारक आहे, असं अजित पवार म्हणाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेली धार्मिक स्थळे आज खूली झाली. अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासोबत मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा जो निकाल लागला त्यात आम्ही सगळीकडे काही एकत्र लढलो नाही. भाजप स्वतंत्र लढला. आम्ही स्वतंत्र लढलो. तसं जर बघितलं आमची तिघांची मतं जर एकत्र केली तर खूपच जास्त होत आहेत. परंतु सध्याची परिस्थितीत सभा घेता आल्या नाहीत. आम्हाला समाधानकारक निकाल दिला आहे. आम्ही खूप आनंदी पण नाही, अन् दु:खी पण नाही, समाधानकारक आहे, असं अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना अजित पवार यांनी निवडणुकांच्या मनिकालानंतर मविआची बैठक झाल्याचं सांगितलं. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ असे आम्ही सगळे बसलो होतो आणि निवडणुकांच्या निकालावर चर्चा केली. पुढे आणखी कसं पुढं जाता येईल यावर चर्चा केली, असं अजित पवार यांनी सांगितलं.

अजित पवार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात पूजा केली.

यावेळी अजित पवार म्हणाले, “कोरोनाचे संकट गेले दीड वर्षे आहे. आम्हाला नाईलाजास्तव मंदिरं बंद ठेवावी लागली होती. कारण जिथं श्रध्दा असते तिथं भाविक मोठ्या संख्येने जात असतात. पहिली लाट, आली दुसरी लाट, त्यानंतर सर्वांचं म्हणणं होतं की आता मंदिरं खुली करायला हवीत. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आजपासून सर्व मंदिरं उघडण्यात अली आहेत. गर्दी होऊ नये यासाठी आम्ही लवकर आलो होतो. आमचा त्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही लवकर आलो. आशीर्वाद मागितले आहेत की लवकरात लवकर कोरोना जावो. आता खूप महत्त्वाचे सण येत आहेत, अशा काळात कोरोनाशी संबंधित नियम पाळावेत अशी सर्वांना विनंती आहे”.

ही काय मोघलाई लागलीय का?

शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं. देशात याआधी अशी परिस्थिती कधी पाहायला मिळाली नव्हती. जवळपास ९ ते १० महिने शेतकऱ्यांनी आंदोलन करत आहेत. आंदोलन सुरु असलं तरी चर्चा करुन मार्ग काढता येऊ शकतो. परंतु दुर्दैवाने मार्ग काढण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना गाड्यांखाली चिरडलं जात आहे. शेतकरी काय वाऱ्यावर आहे काय? उघडला पडलाय काय? ही काय मोघलाई लागली आहे का? असा संतप्त सवाल अजित पवार यांनी केला. तसंच, या घटनेचा निषेध म्हणून ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिली आहे.

 

 

First Published on: October 7, 2021 10:18 AM
Exit mobile version