वयाची शतकपूर्ती करणाऱ्या आजोबांनी हरवले कोरोनाला!

वयाची शतकपूर्ती करणाऱ्या आजोबांनी हरवले कोरोनाला!

वयाची शतकपूर्ती करणा-या आजोबांनी हरवले कोरोनाला!

शतकपूर्ती होण्‍याच्‍या उंबरठ्यावर असतानाच आजोबांना कोरोनाने गाठले आणि‍ घरच्‍या सगळ्याच मंडळींच्‍या काळजाचा ठोका चुकला. आजोबांचा ‘पॉझिटिव्‍ह रिपोर्ट’ आल्‍यानंतर लगेचच १ जुलै रोजी आजोबा महापालिकेच्‍या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्‍णालयात दाखल झाले. आजोबांचे वय लक्षात घेता, रुग्‍णालयातील डॉक्‍टरांनी व कर्मचा-यांनी आजोबांची व्‍यवस्थित काळजी घेतली. तर पूर्वाश्रमीचे शिक्षक असणा-या आजोबांनी देखील उपचारांना अतिशय चांगला प्रतिसाद देत कोरोनावर मात केली.

बुधवारी १५ जुलैला १०१ व्‍या वर्षात पदार्पण करत असलेल्‍या आजोबांना आज रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्‍यात आला, तो त्‍यांचा शतकपूर्तीचा वाढदिवस साजरा करतच ! तर, कोरोनावर मात करणाऱ्या या आजोबांनीही आपल्‍या खणखणीत आवाजात डॉक्‍टरांचे आणि कर्मचार-यांचे आभार मानत कांदिवलीतील आपल्‍या घराकडे कूच केली. महापालिका किटक नाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांचे वडील आहेत.

वयाच्या शंभरीत न्युमोनिया, कोरोनावर मात

अर्जुन गोविंद नारिंग्रेकर हे मूळचे सिंधूदुर्ग जिल्‍हा होण्‍यापूर्वीच्‍या देवगड तालुक्‍यातील नारिंग्रे गावचे रहिवाशी. नारिंग्रेकर आजोबांनी मिठबांव, दहिबांव, विजयदुर्ग, कोळोशी, नारिंग्रे अशा विविध गावातील जिल्‍हा परिषद शाळांमध्‍ये शिक्षक म्‍हणून काम केले. ३१ जुलै १९७८ रोजी मुख्‍याध्‍यापक म्‍हणून निवृत्त झालेल्‍या आजोबांचे अनेक विद्यार्थी आज देश-विदेशात कार्यरत आहेत. तर, सध्‍या आजोबा आपल्‍या मुलाकडे कांदिवली परिसरात राहतात.  आजोबांच्‍या घरातील काही व्‍यक्तिंना कोरोनाची बाधा झाली आणि त्‍यानंतर आजोबांनाही कोरोनाची लक्षणे दिसू लागली. दवाखान्‍यात दाखल झाल्‍यानंतर आजोबांना न्‍युमोनिया देखील असल्‍याचे लक्षात आले आणि मग अतिदक्षता विभागात आजोबांवर उपचार सुरु झाले.

मुळातच शिक्षक असणा-या आजोबांचा खणखणीत आवाज आणि कडक शिस्तीचा अनुभव रुग्‍णालयातील डॉक्‍टरांनी आणि कर्मचार-यांनीही घेतला. जेवणाच्‍या आणि औषधाच्‍या वेळा काटेकोरपणे पाळणा-या आणि डॉक्‍टरांच्‍या सूचना लक्षपूर्वक ऐकून अंमलात आणणा-या आजोबांची कोरोनाशी सुरु असलेल्‍या लढ्यात सरशी झाली. आज आजोबांना डिस्‍चार्ज देण्‍यात आला तेव्‍हा रुग्‍णालयातील कर्मचा-यांनी आवर्जून केक आणून आजोबांचा शतकपूर्तीचा वाढदिवस साजरा करत आजोबांचे आशिर्वाद घेतले. तर नारिंग्रेकर आजोबांनीही रुग्‍णालयातील सर्वच डॉक्‍टर आणि कर्मचा-यांचे भरभरुन आभार मानले.


बोरिवलीतील ८५ वर्षीय साळवी आजोबांनी केली कोरोनावर मात

First Published on: July 14, 2020 7:28 PM
Exit mobile version