हिंदमाता, मुंबई सेंट्रल परिसर पुरमुक्त करण्यासाठी ४१६ कोटींचे २ पंपिग स्टेशन

हिंदमाता, मुंबई सेंट्रल परिसर पुरमुक्त करण्यासाठी ४१६ कोटींचे २ पंपिग स्टेशन

हिंदमाता, मुंबई सेंट्रल परिसर पुरमुक्त करण्यासाठी ४१६ कोटींचे २ पंपिग स्टेशन

मुंबईत २६ जुलै २००५ च्या पूरस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून सखल भागात मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी ६ ठिकाणी मोठ्या क्षमतेचे पंपिंग स्टेशन उभारले. मात्र हिंदमाता परिसरात दरवर्षी साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यात ‘ब्रिटानिया’पंपिंग स्टेशन अपुरे पडत आहे. ही बाब निदर्शनास आल्याने आता हिंदमाता परिसर आणि मुंबई सेंट्रल परिसर येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी आणखीन दोन पंपिंग स्टेशनची नव्याने उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी पालिकेला तब्बल ४१६ कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत. यापैकी एक नवीन पंपिंग स्टेशन चर्नी रोड येथील बालभवन गार्डन येथे दुसरे पंपिंग स्टेशन हाजीअली येथील पंपिंग स्टेशनच्या उर्वरित जागेत अथवा बाजूच्या गार्डनमध्ये उभारण्याचे प्रस्तावित आहे.

हिंदमाता परिसरातील पूर नियंत्रणासाठी नवीन पंपिंग स्टेशनच्या उभारणीसाठी १९१.०६ गोल देऊळ, अलंकार सिनेमा, अलीभाई प्रेमजी मार्ग मुंबई सेंट्रल येथे पूर नियंत्रणासाठी नवीन पंपिंग स्टेशनच्या उभारणीसाठी २२५कोटी रुपये खर्च येणार आहे. एकूणच दोन पंपिंग स्टेशन उभारणीसाठी ४१६ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी पालिका मेसर्स एनजेएस इंजिनियर्स इंडिया प्रा. लि या सल्लागाराची नेमणूक करण्यात येणार असून त्याला एकूण कंत्राटकामाच्या ०.५% इतकी रक्कम म्हणजे १ कोटी ५८ लाख रुपये एवढी रक्कम मोबदला म्हणून देण्यात येणार आहे.

या सल्लागाराने, मुंबई सेंट्रल परिसर आणि हिंदमाता परिसरातील पूर या संदर्भातील प्रस्तावांचा अभ्यास करणे, नियोजन करणे, संकल्प चित्र आणि निविदा दस्तावेज बनविणे, रस्त्याखालील भागातील विद्युत वाहिन्या, जल वाहिन्या, मलनि:सारण वाहिन्यांचे नकाशे तयार करणे, पर्जन्य जलवाहिन्या टाकण्याच्या कामात ठरणाऱ्या बाधांबाबत उपाययोजना सुचविणे, इत्यादी कामे सल्लागाराने करणे अपेक्षित असणार आहे.

मुंबईत २६ जुलै २००५ रोजी अतिवृष्टी आणि समुद्रातील मोठ्या भरतीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन मोठी जीवित व वित्तीय हानी झाली होती. त्यावेळी मुंबईला पुरमुक्त करण्यासाठी सत्यशोधन समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार व ब्रिमस्टोवॅड अहवालानुसार मुंबईत सखल भागात मोठया प्रमाणात सचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आठ ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्याचे सुचविण्यात आले होते. आतापर्यंत हाजिअली, ब्रिटानिया, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलॅन्ड, गझधरबंद, इर्ला या ६ ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहेत. मात्र मोगरा व माहुल पंपिंग स्टेशन उभारणे बाकी आहे.

First Published on: June 8, 2021 10:26 AM
Exit mobile version