मोबाईल चोरामुळे तरुणी ट्रेनमधून पडून जखमी; कुर्ला स्थानकावरील घटना

मोबाईल चोरामुळे तरुणी ट्रेनमधून पडून जखमी; कुर्ला स्थानकावरील घटना

ट्रेनमध्ये उभ्या असलेल्या तरुणीच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरासोबत फरफटत गेल्याने २१ वर्षीय तरुणी ट्रेनमधून पडल्याची घटना कुर्ला रेल्वे स्थानकात घडली. या घटनेत तरुणी जखमी झाली असून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी तरुणीला पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरु असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. याप्रकरणी मोबाईल चोर उमेश गवळी (२१) या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात रेल्वे पोलिसांना यश आले आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी वकिल असून ती परळमधील एका कंपनीत इंटर्न म्हणून कार्यरत आहे. या तरुणीने नेहमीप्रमाणे परळ येथे ट्रेन पकडून फर्स्ट क्लासच्या डब्यात बसली. साधारण सव्वाआठच्या सुमारास ट्रेन कुर्ला स्थानकात पोहोचली. तरुणीला विद्याविहारला उतरायचे असल्याने ती दरवाजात येऊन उभी राहिली. इतक्यात उमेश गवळी घाईघाईने डब्यात चढला. त्याचवेळी या तरुणीजवळील फोन खणाणला. तिने फोन बाहेर काढताच उमेशने तो हिसकावला आणि त्याने फलाटावर उडी मारली. मात्र मोबाईलचे इअरफोन तिच्या हातात असल्याने तीही त्याच्यासोबत फरफटत गेली. यात ती गंभीर जखमी झाली. यावेळी कुर्ला स्थानकावर एकच गोंधळ झाला. हा गोंधळ ऐकून रेल्वे पोलीस सतर्क झाले. त्यांनी मोबाईल घेऊन पळ काढणाऱ्या उमेशचा पाठलाग करुन त्याच्या मुसक्या आवळल्या. उमेश गवळी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध प्रकरणांत नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेमध्ये तरुणीला जबर मार लागला असून तिला पाच टाके पडले आहेत. तसेच पीडित तरुणीचे कुटुंब पुण्यातील असून तिचे वडील रेल्वेत नोकरी करतात. तसेच ‘मुलीची प्रकृती स्थिर असून, तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिला आणच्यासोबत घरी घेऊन जाऊ,’ असे तिच्या वडिलांनी सांगितले आहे.


वाचा – रुग्णाच्या सतर्कतेमुळे रुग्णालयात मोबाईल चोरी करणाऱ्याला अटक

वाचा – तुमचा मोबाईल अ‍ॅन्टी व्हायरस पासून सुरक्षित आहे का?


 

First Published on: April 18, 2019 3:07 PM
Exit mobile version