जोगेश्वरी येथे 23 वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार

जोगेश्वरी येथे 23 वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार

जोगेश्वरी येथे एका 23 वर्षांच्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी या महिलेच्या तक्रारीवरुन जोगेश्वरी पोलिसांनी तिच्या पतीसह त्याच्या दोन आरोपी मित्रांना अटक केली आहे. अटकेनंतर या तिघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने 29 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटस्फोट मिळावा यासाठी आरोपी पतीने त्याच्याच पत्नीवर दोन्ही मित्रांना लैंगिक अत्याचार करण्यास प्रवृत्त करुन त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे मोबाईलवरुन व्हिडीओ शूटींग करुन तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

पिडीत 23 वर्षांची महिला पालघरची रहिवाशी आहे. याच परिसरात आरोपी जावेद (नावात बदल) राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. शाळेपासून त्यांची मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्या प्रेमसंबंधाला तसेच विवाहाला त्यांच्या कुटुंबियांचा विरोध होता. तरीही या दोघांनी प्रेमविवाह केला होता. याच दरम्यान जावेदचे अन्य एका तरुणीशी प्रेम झाले होते. ही माहिती पिडीत महिलेस समजल्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले होते. दोन महिन्यांपूर्वी तो तिला घेऊन जोगेश्वरीतील एका चाळीत घेऊन आला होता. तिथेच त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, काही वेळानंतर त्याचे दोन मित्र मंगेश हर्षनाथ यादव आणि अभिषेक दुबे आले. या दोघांनाही त्याने त्याच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार करण्यास प्रवृत्त केले, इतकेच नव्हे तर तिने विरोध करताच त्याने तिला बेदम मारहाण करुन तिचे तोंड दाबून ठेवले. लैंंगिक अत्याचाराचे त्याने मोबाईलवरुन व्हिडीओ शूटींग केले होते.

हा प्रकार कोणालाही सांगितला तरी जिवे मारण्याची धमकी देऊन ते दोघेही पुन्हा पालघरला आले होते. जिवाच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितले नाही. त्यानंतर तो तिला त्याच्या मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास प्रवृत्त करीत होता. त्याच्या मित्रांसोबतच्या शारीरिक संबंधाचे व्हिडीओ दाखवून तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच तिची बदनामी करुन तिच्याकडे घटस्फोटाची मागणी करीत होता. त्याच्या या ब्लॅकमेलला कंटाळून तिने हा प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पालघर पोलिसांत या तिघांविरुद्ध तक्रार केली होती.

याप्रकरणी सामूहिक बलात्कारासह जिवे मारण्याची धमकी तसेच आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंद होताच त्याचा तपास जोगेश्वरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. हा तपास हाती येताच शनिवारी जावेदसह मंगेश यादव आणि अभिषेक दुबे या तिघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी या गुन्ह्यांची कबुली दिली. या कबुलीनंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

First Published on: January 28, 2020 7:16 AM
Exit mobile version