शिक्षण विभागासाठी 2,733 कोटी

शिक्षण विभागासाठी 2,733 कोटी

मुंबई महापालिका

महापालिकेचा शिक्षण विभागाचा 2019-20 चा अर्थसंकल्प सोमवारी सादर करण्यात आला. अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी विविध योजना राबवण्याची शक्यता असता शिक्षण विभागाने जुन्याच योजनांसाठी नव्याने तरतूद केल्याचे पहायला मिळाले. 2733.77 कोटींच्या सादर केलेल्या अर्थसंकल्पात गतवर्षीच्या तुलनेत 164.42 कोटींची वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय शाळा, क्रीडा अकादमी, संगीत अकादमी, जलद इंटरनेटसह नवीन दूरध्वनी जोडणी, सीसीटीव्ही कॅमेरे अशा जुन्या योजनांसाठीच नव्याने तरतूद करण्यात आली. त्यामुळे पालिकेचा शिक्षण अर्थसंकल्प हा ‘नव्या बाटलीत जुनी दारूच’ ठरला आहे, तर दुसरीकडे शैक्षणिक टॅब, सॅनिटरी पॅड यासारख्या योजनांसाठी तरतूद न करून शिवसेनेच्या योजनांना धक्का लावल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या समिती सदस्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ए.एल. जर्‍हाड यांनी सोमवारी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्याकडे शिक्षण विभागाचा 2733.77 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. गतवर्षी शिक्षण विभागाने 2569.35 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये तब्बल 164.42 कोटींची वाढ करण्यात आली. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये गतवर्षीप्रमाणे जुन्या योजना अधिक भक्कम करण्यावर भर दिला. विद्यार्थी, शिक्षक, शालेय इमारत, साधनसामुग्री आदी सुविधांना समाजकंटकांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पालिकेच्या शाळांमध्ये सहा हजार 666 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी 24.30 कोटींची तरतूद केली, तर त्याचप्रमाणे पाचवी ते दहावीचे वर्ग असलेल्या शाळांमध्ये ई लायब्ररी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी 1.30 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे टॉय लायब्ररी व नवीन बालवाडी वर्गाची निर्मिती, व्हर्च्युअल क्लासरूम यासारख्या जुन्या योजनांसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध योजना, शिष्यवृत्ती योजना, महापौर विद्यार्थी क्रीडा शिष्यवृत्ती, बाह्य स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, फुटबॉल प्रशिक्षण, अक्षरशिल्प प्रकल्प, कौशल्य विकास व व्यवसायाभिमुख मार्गदर्शन, द्विभाषिक शाळा, गुणवत्ता विकास कक्ष व प्रगत शाळा यासाख्या जुन्या योजनांवर भर दिला आहे.

विद्यार्थ्यांच्या बँकेत थेट अनुदान
आगामी शैक्षणिक वर्षात राज्य सरकारच्या ‘थेट अनुदान योजने’नुसार (डीबीटी) पाण्याची बाटली, जेवनाचा डबा, स्टेशनरी या वस्तूंसाठीचे अनुदान थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. यासाठी एप्रिलपर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे विविध बँकांमध्ये खाते उघडण्यात येणार असल्याचे शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी सांगितले, तसेच शैक्षणिक साहित्यामध्ये समानता दिसावी यासाठी गणवेश, बूट, दप्तर, वह्या, रेनकोट आदी वस्तू देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना वह्या व पावसाळी सँडल
पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना लहान व मोठ्या लिपीतील इंग्रजी अक्षरांचे सुडौल लेखन करता यावे, यासाठी दुरेघी व चौरेघी वह्या देण्यात येणार आहेत, तसेच पावसाळ्यात साचलेल्या पाण्यापासून उद्भवणार्‍या आजारापासून संरक्षण करण्यासाठी पहिली ते दहावीमधील विद्यार्थ्यांना पावसाळी सँडल देण्याचा निर्णयही शिक्षण विभागाने घेतला आहे. यासाठी अर्थसंकल्पात 19.69 कोटींची तरतूद केली आहे.

उपनगरांतही विज्ञान कुतूहल भवन
खगोल, भूगोल व आरोग्य या विषयांवरील चलत प्रतिकृती विद्यार्थ्यांना पाहता याव्यात यासाठी महापालिकेचे शहरात एकमेव विज्ञान कुतूहल भवन आहे. उपनगरातील विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी गैरसोय होते.यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रत्येकी एका शाळेत विज्ञान कुतूहल भवन उभारण्यासाठी 1.20 कोटींची तरतूद केली आहे.

विद्यार्थ्यांना पेंग्विन दर्शन
पेंग्विनचे लहानांपासून मोठ्यांना प्रचंड आकर्षण व कुतूहल आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ‘याची देही, याची डोळा’ पेंग्विन पाहण्याची संधी पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. आगामी शैक्षणिक वर्षांमध्ये महापालिकेच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहल पेंग्विन दर्शनासाठी भायखळा येथील राजमाता जिजामाता उद्यान येथे काढण्यात येणार आहे.

रोबोट, अ‍ॅप विकसित करण्याची संधी
208 संगणक प्रयोगशाळांचा वापर करून टिंकर लॅब सुरू करणार. यातून विद्यार्थ्यांना त्रिमीती प्रतिकृती बनवण्यात येणार असून, स्क्रॅच प्रोग्रामिंग, आर्डिनो प्रोग्रामिंगच्या वापरासह थ्रीडी डिझायनिंग आणि प्रिंटींग इलेक्ट्रॉनिक रोबोट बनवणे, मोबाईल अ‍ॅप विकसित करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

इतर महत्त्वाच्या तरतुदी
संगीत कला अकादमी उभारणीसाठी 86 लाख.
शारीरिक शिक्षणासाठी 10 मैदाने उभारण्यासाठी 3. 76 कोटी.
भाषा कौशल्य समृद्ध करण्यासाठी भाषा प्रयोगशाळा उभारणार.
खासगी लोकसहभागातून बाल भवन उभारणार.
शाळा स्तरावरील माहिती संकलनासाठी कंत्राटदाराची नियुक्ती; अशैक्षणिक कामातून शिक्षकांची होणार सुटका.
25 मिनि सायन्स सेंटर्स उभारणीसाठी 66 लाखांची तरतूद.

First Published on: February 5, 2019 5:30 AM
Exit mobile version