Mumbai Metro: मेट्रो रेल्वे, पूल, इमारत बांधकामासाठी ३५५ झाडांची होणार कत्तल

Mumbai Metro:  मेट्रो रेल्वे, पूल, इमारत बांधकामासाठी ३५५ झाडांची होणार कत्तल

मुंबईत मेट्रो रेल्वे, पूल, नाला व इमारत बांधकामांना बाधक ठरणाऱ्या ३५५ झाडांची कत्तल करण्याबाबतचा प्रस्ताव शुक्रवारी होऊ घातलेल्या मुंबई महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. यामध्ये, वांद्रे येथे मेट्रो रेल्वे कामाच्या अंतर्गत ४४ झाडे कापण्यात येणार आहेत तर ४२ झाडे पुनररोपित करण्यात येणार आहेत. तसेच, दहिसर येथे मेट्रो रेल्वे कामाच्या अंतर्गत ७५ झाडे कापण्यात येणार असून १०८ झाडे पुनरारोपित करण्यात येणार आहेत. त्यामुळे मेट्रो रेल्वेच्या कामाच्या अंतर्गत ११९ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे. तर एकूण १५० झाडे मूळ जागेवरून हटवून ती दुसऱ्या ठिकाणी पुनरारोपित करण्यात येणार आहेत.

तसेच, मलबार हिल आणि अंधेरी या ठिकाणी पुलांच्या बांधकामासाठी ४८ झाडांची कत्तल करण्यात येणार आहे तर ६७ झाडे हटवून पुनरारोपित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे, देवनार येथे बंगल्याच्या कामासाठी ६ झाडांची, सांताक्रूझ येथे रेल्वेच्या ६ व्या लाईनच्या कामासाठी ३३ झाडांची तर वडाळा ट्रक टर्मिनल्स येथे नाल्याच्या बांधकामासाठी ४२ झाडांची कत्तल करण्याचे प्रस्ताव मंजुरीला सादर करण्यात आले आहेत.

मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल हे अध्यक्ष पदी असलेल्या, वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत एकूण १७ प्रस्ताव मंजुरीला सादर करण्यात आले आहेत. त्यामध्ये, मेट्रो रेल्वे, पूल, इमारत बांधकाम, नाला बांधकाम, बंगला बांधकाम यासाठी ३५५ झाडांची कत्तल करण्यात येणार असून ४१६ झाडे विकासकामात अडथळा ठरत असल्याने ती मूळ जागेवरून हटवून दुसऱ्या ठिकाणी पुनरारोपित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, १ हजार ५३० झाडे जैसे थे स्थितीत ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे सदर प्रस्तावावरून या बैठकीत वादळी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


हेही वाचा – सर्व दुकानांवर आता मराठी पाट्या राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

First Published on: January 13, 2022 8:35 PM
Exit mobile version