मंत्रालय कॅन्टिनच्या १३ वेटरसाठी ७ हजार अर्ज

मंत्रालय कॅन्टिनच्या १३ वेटरसाठी ७ हजार अर्ज

प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यात नोकर्‍या मिळणे त्यातल्या त्यात सरकारी नोकर्‍या मिळणे किती अवघड झाले आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मंत्रालयातील कॅन्टिनमधील नोकर भरतीकडे पाहावे लागेल. मंत्रालयीन कॅन्टिनसाठी वेटरच्या १३ जागा भरायच्या आहेत. यासाठी मागवण्यात आलेल्या अर्जांमध्ये सात हजार युवकांनी सहभाग घेतला. चौथी पास अपेक्षित असलेल्या या जागांसाठी आलेले उमेदवार पदवीधर, उच्च शिक्षित आणि इंजिनियरिंग आणि कायद्याचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत. राज्यातील सुशिक्षितांच्या एकूणच परिस्थितीची ही गंभीर अवस्था मंत्रालयात चर्चेचा विषय बनली आहे.

इंजिनिअर असलेल्या तरुणांनी वडापाव किंवा चहाचे दुकान काढल्याच्या अनेक घटना आपल्या नजरेत आल्याही असतील. देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात शिकलेल्या तरुणांची संख्या खूपच आहे. शिक्षणाच्या तुलनेने नोकर्‍या मिळत नाहीत. त्यात सरकारी नोकर्‍या मिळणे आता जणू दुरापास्तच झाले आहे. मुंबई येथील मंत्रालयातील कॅन्टिन वेटरच्या १३ जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. या नोकरीसाठी तब्बल ७ हजार तरुणांनी अर्ज केले आहेत. वेटरच्या भरतीसाठी शिक्षणाची अट केवळ चौथी उत्तीर्णची आहे. पण अर्ज केलेल्यांमध्ये एकही चौथीपर्यंत शिक्षण घेतलेला नाही. जे आहेत ते सगळे पदवीधर, इंजिनियर आणि लॉ केलेले आहेत. यात तरुणांच्या जोडीने तरुणींचाही मोठा सहभाग असल्याचे सांगण्यात आले.

वेटर या पदासाठी कमीत कमी ४थी शैक्षणिक पात्रतेची अट असून या पदाकरिता १०० गुणांची लेखीपरीक्षा घेण्यात आली आहे. १३ जणांच्या निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. निवड झालेल्या १३ जणांपैकी ८ पुरुष तर इतर ५ महिला आहेत. वेटरपदी निवड झालेल्या १३ पैकी १२ जण हे पदवीधर आहेत तर एकजण १२ वी पास आहे. त्यामुळे आरक्षणासाठी जरी मोर्चे निघाले तरी, १३ पदांसाठी जेव्हा ७ हजार पदवीधर तरुणवर्ग अर्ज करतात यावरून तरुणांमधील बेरोजगाराीचे वास्तव किती भयानक आहे, हे समजते.

सरकारी नोकरीकडे कल..
देशातील बेरोजगारीची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्या मानाने निर्माण होणार्‍या नोकर्‍यांची संख्या मात्र मर्यादित आहे. अशा परिस्थितीत खाजगी क्षेत्रातील नोकर्‍यांपेक्षा तरुणांचा कल सुरक्षेची हमी देणार्‍या सरकारी नोकर्‍यांकडे अधिक दिसतो आहे. खाजगी क्षेत्रातील नोकर्‍यांमध्ये पैसा तर मिळतो पण या नोकर्‍यांची शास्वती नसते. तसेच खाजगी कंपन्या म्हणेल त्या वेळेत म्हणेल तितका वेळ काम करून घेतात त्याचबरोबर खाजगी कंपन्यांमध्ये सुट्ट्यांची देखील समस्या असते त्यामुळे आजकाल तरुण तरुणींचा कल सरकारी नोकरीकडे जास्त असल्याचे कॅन्टिनच्या नोकरभरतीतून पाहायला मिळते आहे.

First Published on: January 20, 2019 5:46 AM
Exit mobile version