बोईसरमध्ये रात्री टँकर वाहतुकीला बंदी

बोईसरमध्ये रात्री टँकर वाहतुकीला बंदी

टँकर

रात्रीच्यावेळी औद्योगिक वसाहतीत टँकर वाहतुकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयाची सोमवारपासून अंमलबजावणी सुरू करण्यात आली. पालघर – तारापूर औद्योगिक क्षेत्रात टँकरमधून घातक सांडपाणी उघड्यावर सोडण्याच्या काही कारखान्यांच्या कृतीला आळा बसावा, यासाठी सायंकाळी 6 ते सकाळी 7 या वेळेत टँकर वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासकीय विभागांनी आखलेल्या नियमांचा आढावा घेण्यासाठी टीमा सभागृहात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय हरित लवादाने जारी केलेल्या यादीनुसार तारापूर औद्योगिक क्षेत्र हे भारतातील सर्वात प्रदूषित औद्योगिक क्षेत्र असल्याचे म्हटले आहे. या परिसरातील प्रदूषणाला आळा बसावा, यासाठी प्रदूषण नियंत्रण महामंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, उद्योजकांची संस्था तसेच महसूल विभागाने वेगवेगळ्या उपाययोजना आखल्या आहेत. यासाठी पालघरच्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली आहे.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषण नियंत्रणासंदर्भात तारापूर येथील ’टिमा’ सभागृहात एक बैठक पार पडली. या बैठकीत प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली. रात्रीच्या वेळी औद्योगिक वसाहतीत टँकर वाहतुकीवर निर्बंध घालण्याच्या निर्णयावर सोमवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सर्वानुमते या बैठकीत ठरले होते.

सर्व उद्योजक, पोलीस यंत्रणांना याबाबत सूचित करण्यात आले असून येत्या आठवड्याभरात तारापूर औद्योगिक परिसरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात येणार आहेत. प्रदूषण नियंत्रणाबाबत झालेल्या या बैठकीत तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जवळपास 400 उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

First Published on: August 27, 2019 5:32 AM
Exit mobile version