मुंबईची लाईफलाईन पुन्हा होणार सुरू? आज निर्णय होण्याची शक्यता

मुंबईची लाईफलाईन पुन्हा होणार सुरू? आज निर्णय होण्याची शक्यता

मुंबईची लाईफलाईन

मुंबईची लाईफलाईन असणारी मुंबईची लोकल सेवा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे काहिशी ठप्प झाली आहे. कोरोनाचे वाढते संकट आणि होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाखो नागरिकांना ने-आण करणारी मुंबईची लोकल ट्रेन देखील कोरोनामुळे शांत झाली.

राज्य सरकारचं केंद्राला साकडं

दरम्यान, या लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काहीशी शिथिलता आणत देश पुन्हा अनलॉक होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्याचे दिसत आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांसाठी रेल्वे सेवा सुरू करायला केंद्राने परवानगी द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. सध्या एसटी आणि बेस्टवर पडणारा ताण बघता केंद्राने रेल्वे सुरू करावी, अशी मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही दिवसांपुर्वी केली होती.

मुंबई लोकल सुरू करण्याबाबत चर्चा सुरू

मात्र आज किंवा उद्या अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिकांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोईसाठी लोकल सुरू व्हावी, अशी महाराष्ट्र सरकारची भूमिका असून पुन्हा मुंबई लोकल सेवा सुरू करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींसाठी लोकल सेवा कशी उपयुक्त आहे, याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांच्यासोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिली.

लोकल पुन्हा सुरू झाल्यास दिलासा

मुंबई लोकल पुन्हा सुरू झाल्यास अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोकल सेवा सुरू करण्याबाबतची आपली भूमिका याआधीच केंद्र सरकारला कळवीली आहे. रेल्वे प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या याबाबत चर्चा सुरू असून लोकल सेवा सुरू केली तर ती कोणत्या स्वरूपात असावी याबाबतची चर्चा सुरू असल्याचे वृत्त न्यूज १८ लोकमतने दिले आहे.


लोकल सुरू करण्यासाठी राज्य सरकारची केंद्राकडे मागणी

मध्य रेल्वेचा खुलासा

लोकल सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळाली नसल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. शनिवारी रात्री उशीरा मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.

“उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत अनेक चर्चा पसरत आहे. परंतु रेल्वे पुन्हा सुरू करण्याबद्दल आम्हाला कोणत्याही प्रकारचे निर्देश मिळालेले नाहीत, त्याबाबातच्या सूचना आम्हाला मिळताच माहिती दिली जाईल.” अशा आशयाचं ट्विट सुतार यांनी केले आहे.

First Published on: June 14, 2020 10:40 AM
Exit mobile version