‘त्या’ पाच रस्त्यांवर २८ वाहनांवर कारवाई; केला ६५ हजारांचा दंड वसूल

‘त्या’ पाच रस्त्यांवर २८ वाहनांवर कारवाई; केला ६५ हजारांचा दंड वसूल

या वाहनांवर कारवाई

मुंबईतील पाच रस्ते प्रायोगिक तत्वावर पार्किंग मुक्त करण्याची घोषणा झाल्यानंतर याच्या अंमलबजावणीला शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. शहरातील महर्षी कर्वे, गोखले मार्ग, पूर्व उपनगरांतील लाल बहादूर शास्त्री मार्ग व पश्चिम उपनगरांतील एस.व्ही रोड व न्यू लिंक रोडवरील १४ कि.मी अंतरावर ही पार्किंगमुक्त मोहिम राबवण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पहिल्याच दिवशी २८ वाहनांवर कारवाई करून ६५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये ६ दुचाकी, २ तीन चाकी आणि २० चारचाकी वाहनांचा समावेश आहे.

मुंबईत ३० ऑगस्ट २०१९ पासून महत्त्वाच्या पाच रस्त्यांचा काही भाग प्रायोगिक तत्वावर ‘पार्किंग मुक्त’ करण्यात येणार आहे. या मध्ये दक्षिण मुंबईतील महर्षी कर्वे मार्ग व गोखले मार्ग, पूर्व उपनगरातील लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि पश्चिम उपनगरातील स्वामी विवेकानंद मार्ग व न्यू लिंक रोड या रस्त्यांच्या सुमारे १४ किमीच्या अंतराच्या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजू ’पार्किंग मुक्त’ असणार आहेत. वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने पाच रस्त्यांच्या काही भागात राबविण्यात येणाऱ्या ‘पार्किंग बंदी’सह सर्व बेस्ट बस थांब्यांच्या दोन्ही बाजूला ५० मीटर, यानुसार एकूण १०० मीटरच्या परिसरात ‘नो पार्किंग’ अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी संबंधित परिमंडळीय सह आयुक्त, उपायुक्त तसेच विभाग स्तरीय सहाय्यक आयुक्तांना दिले होते. त्यानुसार या पाचही रस्त्यांवर शुक्रवारपासून कडक कारवाई करण्यात आली. यामध्ये जी/उत्तर विभागातील गोखले नॉर्थ व के/पश्चिममधील न्यू लिंक रोडवर एकही कारवाई करण्यात आलेली नाही. तर महर्षि कर्वे रोडवरच वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दोन दुचाकींकडून १५ हजार रुपये तर ५ चारचाकी वाहनांकडून ५०हजार रुपये याप्रमाणे ६५ हजार रुपायांचा दंड वसूल करून वाहने सोडण्यात आली आहेत. या पाच रस्त्यांवर एकूण २८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यापैकी ३ दुचाकी, २ तीन चाकी १५ चार चाकी अशाप्रकारे एकूण २० वाहने जप्त करण्यात आली असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

First Published on: August 30, 2019 9:29 PM
Exit mobile version