अदानी वीजबिल म्हणजे जनतेची फसवणूक – संजय निरुपम

अदानी वीजबिल म्हणजे जनतेची फसवणूक – संजय निरुपम

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांपासून अदानी पॉवर कडून देण्यात येणाऱ्या वीजबिलांमध्ये प्रचंड दरवाढ करण्यात आलेली आहे. MERC ने ०.२५% इतकी दरवाढ करण्याची मुभा दिलेली असताना सुद्धा ५०% पेक्षा जास्त दराने लोकांना वीजबिल येत आहे आणि जर कोणी त्याविरोधात तक्रार करण्यास गेले, तर त्या वीजग्राहकाचे वीज कनेक्शन कापण्यात येत आहे. या वाढलेल्या वीजबिलांची चौकशी झाली पाहिजे आणि जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही, जोपर्यंत योग्य वीजबिल येत नाही, तोपर्यंत कोणत्याची वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडायचे नाही असा इशारा आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी अदानी पॉवरला दिला. आज संजय निरुपम यांनी अदानी पॉवरच्या अंधेरी पश्चिम येथील तक्रार निवारण केंद्राला भेट दिली होती त्यावेळेस ते बोलत होते.

काय म्हणाले निरुपम

“आम्ही आज या तक्रार निवारण केंद्राला भेट दिली. येथे येणाऱ्या तक्रारदारांशी सुद्धा बोलणे केले. पण येथे वीजग्राहकांच्या तक्रारींचे निवारण होण्याऐवजी तक्रार करणाऱ्यांचेच वीजबिल कापण्यात आल्याचे आम्हाला आढळून आले. ही सामान्य जनतेची पिळवणूक आहे. ही तक्रार निवारण केंद्रे तक्रार निवारण्यासाठी नसून निव्वळ जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करत आहेत. जनतेची फसवणूक होत आहे. याबाबत आम्ही या तक्रार केंद्रातील कर्मचाऱ्यांना याबद्दल विचारणा केली आणि वीजबिलांबाबतच्या तक्रारींचे निवारण झाल्याशिवाय कोणाचेही वीज कनेक्शन कापायचे नाही, अशी मागणी केली.” – संजय निरुपम

ही जनतेची लूट आहे

ज्या लोकांच्या घरात १ पंखा आणि एक दिवा आहे, त्यांना देखील २,५०० ते ३००० रुपये इतके बिल आलेले आहे. ज्या माणसाचे पोटच रोजंदारीवर चालत असेल, अशी व्यक्ती हे इतके वीजबिल कसे भरणार. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना वीजबिलाच्या ड्यू डेट च्या एक दिवस अगोदर वीजबिल हातात पडत आहे आणि जर ड्यू डेट च्या अगोदर बिल भरले नाही, तर कंपनीकडून चार्ज लावण्यात येतो. ही सरळसरळ जनतेची लूट आहे आणि हे आम्ही सहन करणार नाही. आमची अदानी पॉवरकडे अशी मागणी आहे की, वीजग्राहकांची फसवणूक त्यांनी थांबवावी, लवकरात लवकर ग्राहकांच्या वाढलेल्या बिलांची चौकशी करून त्यांना योग्य बिल पाठवून द्यावे व विजेच्या दरांमध्ये कपात करावी आणि जर का असे झाले नाही, तर भविष्यामध्ये मुंबई काँग्रेस त्यांच्या विरोधात मोठे आंदोलन करेल व हे आंदोलन तोपर्यंत सुरु राहील जोपर्यंत या वीजग्राहकांना न्याय मिळणार नाही, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले.

First Published on: December 17, 2018 9:13 PM
Exit mobile version