नवे सरकार निवडणुकीला घाबरत असल्याने वॉर्ड रचना बदलली; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

नवे सरकार निवडणुकीला घाबरत असल्याने वॉर्ड रचना बदलली; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

२०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार असल्याचा निर्णय शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळानं घेतला आहे. मविआ सरकारने वाढविलेली वॉर्डांची संख्या नियमबाह्य पद्धतीने केली असल्याचं सांगत ती रद्द करण्यात आल्याचा निर्णय शिंदेंच्या मंत्रिमंडळानं घेतला. त्यामुळे आता २०११ च्या जनगणनेनुसार २०१७ साली वॉर्ड संख्या ठरली होती तीच यंदाच्या निवडणुकीत कायम राहणार आहे. यावरून युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! नवी वॉर्ड रचना रद्द, २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच महापालिका निवडणुका होणार

‘हे सरकार निवडणुकीला घाबरत आहे. ज्या नगरविकास मंत्र्यांनी नवीन वॉर्ड रचना जाहीर केली होती, त्याच नगरविकास मंत्र्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ती वॉर्ड रचना रद्द केली, त्यामुळे हे सरकार निवडणुकीला घाबरत असल्याचं स्पष्ट झालं आहे,’ असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला. आदित्य ठाकरे यांचा शिवसंवाद दौरा राज्यभर सुरू आहे. या  सभा घेतल्यानंतर आदित्य ठाकरे मुंबईत परतले असून मुंबईतील निष्ठा यात्रा सुरू करण्यात आली आहे. निष्ठा यात्रेदरम्यान त्यांनी मुंबईतील विभागवार शिवसेना शाखांचा आढावा घेण्यास गुरुवारपासून सुरुवात केली. पहिल्याच दिवशी त्यांनी भायखळा, वरळी आणि प्रभादेवी येथील काही शाखांना भेट देऊन पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

हेही वाचामविआने घेतलेल्या वॉर्ड रचनेचा निर्णय रद्द करण्याची शिंदे सरकारला गरज नव्हती, महेश तपासेंचा हल्लाबोल

एकीकडे शिवसेनेला खिंडार पडले असून दुसरीकडे सर्व महापालिकांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेत शिवसेनेची गेले ३० वर्षे सत्ता आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. बंडखोरीनंतर आणि युती नसतानाही शिवसेना एकहाती पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी शिवसैनिकांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

हेही वाचा महागाईविरोधात काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन, राजभवनला घालणार घेराव

‘आपण केलेली कामं घरा-घरापर्यंत पोहोचवा. केलेल्या कामाची माहिती द्या. नवीन मतदारयादीत मतदारराजाची नोंद वाढवा. हे सरकार बेकायदेशीर आहे आणि ते पडणारच आहे. त्यामुळे आपण केलेल्या कामाची माहिती देऊन मतदारराजाला जागृत करा,’ असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

First Published on: August 5, 2022 9:50 AM
Exit mobile version