शेतकऱ्यांनी नववर्ष दुःखामध्ये साजरं करायचं का? अजित पवारांचा सरकारला सवाल

शेतकऱ्यांनी नववर्ष दुःखामध्ये साजरं करायचं का? अजित पवारांचा सरकारला सवाल

Ajit pawar Cleares his stand on Entre in BJP

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा आठवडा सुरू आहे. आजच्या दिवशी विरोधक सत्ताधाऱ्यांना अवकाळीच्या मुद्द्यावरुन घेरण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करण्यात आली. याच मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक होत सभात्याग केला आहे. यावेळी अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. “शेतकऱ्यांनी नववर्ष दुःखामध्ये साजरा करायचा का? तसंच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणतंही गांभिर्य नसल्याचा आरोप यावेळी अजित पवार यांनी केलाय.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्य बेमुदत संपावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी अपमानजनक भाषेत भाष्य केलं. यावर बोलताना अजित पवार म्हणाले. या सरकारमधील लोकप्रतिनिधींना बोलताना कोणतंही तारतम्य राहिलेलं नाही. एकीकडे शाळेचे पेपर चेक करण्यासाठी शिक्षक तयार नाहीत. शिक्षक पेपर तपासण्यासाठी तयार नाहीत. अनेक ठिकाणी तर खेडोपाड्यात शिक्षक नसल्यामुळे त्या त्या गावातील गावकऱ्यांनीच शाळा चालवायला घेतली आहे. मराठवाडा आणि विदर्भासह संपूर्ण राज्यातील शेतकरी हवालदिल झालाय. अशी स्थिती आतापर्यंत मी कधी पाहिली नाही, असं देखील यावेळी अजित पवार म्हणाले.

यापुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, “आमच्याही सरकारकाळात अशीच अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर केली होती. पंचनामे होत राहतील, पण शेतकऱ्यांना जिथे तातडीची मदत हवी आहे, तिथे आम्ही दिली होती. असे निर्णय घेता येतात. पण त्यासाठी सरकारची इच्छाशत्ती असावी लागते. या शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्ती नसल्यामुळे राज्याचा शेतकरी उद्धवस्त झालाय. सगळीकडे गाररपीट होत आहे, पीक उद्धवस्त झाली आहेत. पण हे पाहून सरकारला मात्र घाम फुटत नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे.”

तसंच येत्या दोन दिवसात नववर्षाची सुरूवात होतेय. गुडीपाडव्याच्या दिवशी शेतकऱ्याने नववर्ष कसा साजरा करायचा? दुःखामध्ये शेतकऱ्याने नववर्षाचं स्वागत करावं का? असा सवाल देखील यावेळी अजित पवारांनी उपस्थित केलाय.

तसंच आमदार सुनील केदार यांनी देखील सरकारला घेरलंय. “कर्माचारी संपावर आहेत म्हणून पंचनामे होत नाहीत असं कारण दिलं जातं. पण जी २० कार्यक्रमाला कर्मचारी येतात मग पंचनामे का करत नाहीत? शासकीय कार्यक्रम करण्यासाठी सगळे कर्मचारी हजर राहतात आणि शेतकऱ्यांच्या पंचनाम्यासाठी कर्मचारी हजर राहत नाही. हे दुर्देव आहे. याचा आम्ही निषेध करतो,”, असं यावेळी सुनील केदार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी सुद्धा शिंदे-फडणवीस सरकारवर आरोप केलेल. “इतकं असंवेदवशील सरकार मी आतापर्यंत पाहिलं नाही. ६० हजार हेक्टर जमीन प्राथमिकदृष्ट्या गारपीटीमुळे उद्धवस्त झाल्याचं सरकारकडेच नोंद आहे. पंचनामे करायला कुठलाही कर्मचारी तयार नाही. काही कर्मचारी तयार होतात तर ते सही करायला तयार होत नाही. त्यामुळे पंचनाम्याला काही अर्थ उरणार नाही. उद्या सरकारने अनुदान जरी जाहीर केलं तर ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाही ते वगळले जातील. शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याऐवजी हे सरकार पळकाढूपणा करत आहे. कुठल्याही प्रकारच्या मदत अनुदान घोषित करण्याची भावना या सरकारची दिसत नाही. ही सरकारची भूमिका आमच्या लक्षात आली आहे. यासाठीच आम्ही सभात्याग केलाय.” असं देखील धनंजय मुंडे म्हणतात.

First Published on: March 20, 2023 12:04 PM
Exit mobile version