अर्धा तास ढिगाऱ्याखाली होते तरीही ते वाचले

अर्धा तास ढिगाऱ्याखाली होते तरीही ते वाचले

अंधेरी दुर्घटनेतील जखमी

मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ७ वाजता द्वारकाप्रसाद शर्मा (४७) आणि गिरीधारी सिंग (४०) हे दोघेही कामावर निघाले होते. नेहमी सारखे गोखले ब्रीज वर पोहोचले. पण, जीर्ण झालेला गोखले पुल अचानक कोसळला आणि त्या पूलासोबत हे दोघेही खाली कोसळले. जवळपास अर्धातास ढिगाऱ्याखाली अडकले. जेव्हा शोधाशोध सुरू झाली तेव्हा त्यांना रेल्वे पोलिसांनी ढिगाऱ्यातून बाहेर काढले. या घटनेत हे दोघेही जखमी झाले आहेत. त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून त्यांना पोलिसांनी लगेचच ढिगाऱ्याखालून बाहेर काढलं.

दोघांची प्रकृती स्थिर

या घटनेत द्वारकाप्रसाद शर्मा यांच्या पायाला दुखापत झालीआहे. त्यांना सध्या जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आले आहे. तर, गिरीधारी सिंग यांच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांना दुखापत झाली आहे. शिवाय, पाठीच्या मणक्याला ही मार बसला आहे. या दोघांची ही प्रकृती ठीक असल्याचे कूपर रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. द्वारकाप्रसाद शर्मा आणि गिरीधार सिंग हे दोघेही सिक्युरिटी गार्ड म्हणून एका कंपनीत काम करतात. दोघेही एकत्र कामावर जात असताना ही घटना घडली आहे.

प्रशासनाकडून जखमींना १ लाखांची मदत

आज सकाळी पावणे आठ वाजता अंधेरीतील गोखले पादचारी पुल अचानक कोसळला. या दुर्घटनेत एकूण ५ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी चौघांची प्रकृती स्थिर आहे. पण अस्मिता काटकर या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्यांना रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येकी १ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

First Published on: July 3, 2018 6:50 PM
Exit mobile version