खारफुटीच्या संरक्षणासाठी विशेष दक्षता पथक नेमा, काँग्रेसची मागणी

खारफुटीच्या संरक्षणासाठी विशेष दक्षता पथक नेमा, काँग्रेसची मागणी

खारफुटीच्या संरक्षणासाठी विशेष दक्षता पथक नेमा, काँग्रेसची मागणी

मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्रकिनारा आणि खाडी परिसरात किनाऱ्याचे संरक्षण करणाऱ्या खारफुटीची होणारी कत्तल रोखण्यासाठी पालिकेने विशेष दक्षता पथकाची नियुक्ती करावी. तसेच, खारफुटीची कत्तल करून स्वार्थ साधणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक वीरेंद्र चौधरी (वार्ड क्रमांक ३३) यांनी महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे केली आहे.

खारफुटीचे अस्तित्वच धोक्यात आले

कायद्याने समुद्र, खाडीलगत असलेली खारफुटी तोडण्यास, त्याची कत्तल करण्यास मनाई आहे. मात्र मुंबईत विशेषतः वांद्रे, वडाळा, घाटकोपर, माहीम आदी भागात मोठ्या प्रमाणात खारफुटी असताना त्याची कत्तल करून तेथील जागेत भरणी करून ती जागा अतिक्रमित केली जात आहे. अनेक भुमाफिया, झोपडीदादा अशा जागा बळकावून तेथे झोपड्या बांधून आणि त्यांची विक्री करून लाखो रुपयांचा मलिदा कमावत आहेत. त्यामुळे खारफुटीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. मात्र पालिका प्रशासन या गंभीर प्रकरणात उदासीन असल्याचे दिसून येते.

हा भाग म्हणजे मुंबई शहराला लाभलेली पर्यावरणपूरक नैसर्गिक वनसंपदा

काँग्रेसचे नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांनी मुंबईतील खारफुटीचे संरक्षण करण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. महापालिकेच्या हद्दीत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग तसेच खारफुटीचा भाग हा अधिसूचित भाग समाविष्ट आहे. हा भाग म्हणजे मुंबई शहराला लाभलेली पर्यावरणपूरक नैसर्गिक वनसंपदा आहे. वास्तविक, खारफुटीची जंगले ही संरक्षक भिंतीसारखी असतात. त्या मनुष्यवस्त्यांच्या संरक्षणाचे मुख्य काम करतात. असे म्हणतात की, खारफुटिंमध्ये त्सुनामीसारखी तुफान वादळे थोपविण्याची क्षमता असते. तसेच, ही खारफुटी सागरी जैववैविध्याचे संवर्धन करतात. जलचर आणि पाणथळ पक्षी, पाण्यावर तरंगणारे सूक्ष्म जीव खारफुटीच्या परिसंस्थेतच आश्रयाला असतात, असे चौधरी यांचे म्हणणे आहे.

भविष्यात खारफुटीची झाडे मुंबईकरांना पाहायलाही मिळणार नाहीत

त्याचप्रमाणे, खारफुटीची झाडे पर्यावरणाला आणि मानवी जीवनाला अत्यंत उपयुक्त असतात. मात्र काही स्वार्थी लोक आपल्या वैक्तिक स्वार्थासाठी यक खारफुटीची कत्तल करतात. त्यामुळे खारफुटीच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे. भविष्यात खारफुटीची झाडे मुंबईकरांना पाहायलाही मिळणार नाहीत. त्यामुळे खारफुटी झाडे टिकून राहणे आणि त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. खारफुटीच्या संरक्षणासाठी शासकीय यंत्रणा कार्यान्वित असली तरी त्यांचे खारफुटीचे अस्तित्व जपण्याकडे दुर्लक्ष होत आहे, असे नगरसेवक चौधरी यांनी म्हटले आहे.

मुंबई महापालिकेने, मुंबईतील खारफुटीची होणारी कत्तल रोखण्यासाठी पालिकेने विशेष दक्षता पथकाची नियुक्ती करावी आणि खारफुटीची कत्तल करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांनी केली आहे.

यासंदर्भातील ठराव त्यांनी मांडला असून पालिकेच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. हा ठराव एकमताने मंजूर झाल्यास आणि त्यावर आयुक्तांनी सकारात्मक अभिप्राय दिल्यावर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


हेही वाचा – टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक TV च्या सीईओना अटक


 

First Published on: December 13, 2020 12:09 PM
Exit mobile version