भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी अरविंद सावंत यांची नियुक्ती

भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी अरविंद सावंत यांची नियुक्ती

शिवसेना उपनेते आणि माजी आमदार सूर्यकांत महाडिक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी आता शिवसेनेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावंत यांचे नियुक्तीपत्र शिवसेनेकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. अरविंद सावंत हे कट्टर शिवसैनिक आणि निष्ठावान समजले जातात. गेली ३५ वर्षे ते युनियन क्षेत्रात काम करत आहेत. भाजपसोबतची युती तोडून महाविकास आघाडीचा पाय रचताना दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांना त्यांच्याकडील केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाचा कार्यभार सोडून द्यावा लागला होता.

महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेने भाजपसोबत युती तोडली. त्यामुळे केंद्रात मंत्रिपदी असलेले शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मध्यंतरीच्या काळात त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयकाचे कॅबिनेट मंत्रीपदाच्या दर्जाचे पद देण्यात आले होते. मात्र दुहेरी लाभाचे पद असल्याने त्यांना ते पद देखील सोडावे लागले होते. अखेर शिवसेना नेतृत्वाकडून अरविंद सावंत यांची भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेल्या कामगार कल्याणासाठी मी काम करत राहीन. तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याबद्दल जो विश्वास दाखवला त्याला खरे उतरण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. मराठी कामगारांना न्याय मिळवून देतानाच जास्तीत जास्त मराठी माणसाला रोजगार कसा प्राप्त होईल, यासाठीही मी प्रयत्न करीन.

अरविंद सावंत, अध्यक्ष, भारतीय कामगार सेना

अरविंद सावंत यांनी ३ दशकं महानगर टेलिफोन निगम लिमिटेडचं नेतृत्त्व केलं आहे. त्यांना कामगार, कामगार मंत्रालय, केंद्राची कामगार धोरणे याबद्दलचा दीर्घ अनुभव देखील आहे. त्यामुळेच भारतीय कामगार सेनेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगितले जाते.

First Published on: February 7, 2021 8:56 PM
Exit mobile version