धक्कादायक! क्रिकेट खेळताना पोलीस अधिकार्‍याचा मृत्यू

धक्कादायक! क्रिकेट खेळताना पोलीस अधिकार्‍याचा मृत्यू

सहायक पोलीस निरीक्षक संदीप सानप

क्रिकेट खेळताना सहायक पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी (दि.४) पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे घडली. संदीप वसंत सानप (३८, मूळ रा.चिंचोली, ता.सिन्नर) असे मृत पोलिसाचे नाव असून ते मूळचे नाशिकचे आहेत. त्यांच्या मृत्यूने नाशिकसह पालघर पोलीस वर्तुळात शोककळा पसरली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २०१९ पासून पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून संदीप सानप हे नियुक्त होते.

पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध पोलीस ठाण्यांच्या रायझींग डे चे आयोजन केले जात आहे. या सप्ताहामध्ये कायद्याचे प्रबोधन करणे, गुन्ह्यासंबंधी माहिती देणे, पोलीस दैनंदिन कामकाज नागरिकांसमोर मांडणे, शस्त्र प्रदर्शन भरवणे, क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यातील सर्व पोलीस ठाणेअंतर्गत सफाळे येथील मकुणसार भागात शनिवारी (दि. ४) क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले. सामाना पालघर, केळवा, अर्नाळा, डहाणू, मोखाडासह १९ पोलीस ठाण्यांमध्ये होणार होता.

शनिवारी केळवा विरुद्ध सेफाळे पोलीस ठाण्यात क्रिकेट सामना झाला. सहायक पोलीस निरीक्षक सानप हे मैदानात खेळत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना सुरुवातीला पोलिसांनी सफाळे रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारार्थ वसई येथील प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करत त्यांना मृत घोषित केले.

शेवटपर्यंत खेळून मिळवला विजय

संदीप सानप यांनी शेवटपर्यंत क्रिकेट खेळत राहिले. त्यांना विक्रमी धावा करत सफाळे पोलीस ठाण्याचा विजय खेचून आणला. सामाना जिंकल्यानंतर ते मैदानाबाहेर येताच त्यांना छातीत दुखू लागले. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी सहकाऱ्यांना रुग्णालयात जाण्याबाबत चर्चा केली. पोलिसांनी त्यांना सफाळे रुग्णालयात दाखल केले असता त्यांना अधिक त्रास सुरु झाला. डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारार्थ वसईला नेण्यास सांगितले. पोलिसांनी त्यांना प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

First Published on: January 4, 2020 6:15 PM
Exit mobile version