वाडा बसस्थानकात खड्डेच खड्डे

वाडा बसस्थानकात खड्डेच खड्डे

(वाडा बस स्थानकाची अशी दुरवस्था झाली आहे)

पावसाळा सुरू होण्यापूर्वी वाडा बस स्थानकात पडलेले खड्डे व्यवस्थित न बुजवले गेल्याने आता या खड्डयांची खोली अर्धा ते एक फुटांपर्यंत गेली आहे. बस स्थानकात येणार्‍या प्रत्येक बसचे स्वागत खड्डयातून होत असल्याने नव्याने बस घेऊन येणार्‍या चालकाला या खड्डयांचा अंदाज येत नसल्याने प्रवाशांची आदळआपट होत आहे. नवीन बस गाड्याही या खड्ड्यांमुळे नादुरुस्त होत असल्याचे वाहकांनी सांगितले.

वाडा तालुका हा पालघर व ठाणे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने पालघर जिल्ह्यातील नागरिकांना ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना पालघर जिल्ह्यात ये-जा करण्यासाठी वाडा येथूनच जावे लागते. दिवसभरात वाडा बस स्थानकातून तीनशेहून अधिक बसफेर्‍या आहेत. या खड्ड्यांमुळे बसेसही नादुरुस्त होत आहेत.

वाडा एसटी आगार येथे असलेल्या भव्य जागेत बस स्थानक बांधण्यात आलेले आहे. मात्र हे बस स्थानक वाडा बाजारपेठपासून 300 ते 350 मीटर लांब अंतरावर असल्याने वाडा शहरात राहणार्‍या प्रवाशांसाठी ते सोयीस्कर नसल्याने शहरातील जुन्याच बस स्थानकातून प्रवाशांची वाहतूक होत आहे.

मागील अनेक दिवसांपासून स्थानकाच्या आवारातील विद्युत दिवे बंद आहेत. स्थानकाच्या शेजारीच असलेल्या पाणपोई जवळच कचरा साठवून ठेवला जातो. तर ध्वनिक्षेपकातून सारखेच आवाहन केले जाते की मातांनी स्तनपाणासाठी हिरकणी कक्षाचा वापर करावा मात्र हे हिरकणी कक्ष मागील दोन वर्षांपासून मोडीत निघालेले आहे. तर अपुर्‍याजागेेे जागेमुळे सकाळी व संध्याकाळी बाहेर गावी जाणार्‍या व येणार्‍या गाड्यांची रेलचेल जास्त असल्याने या दोन्ही वेळी वाहतूक कोंडी होऊन प्रवासी तसेच पादचार्‍यांचीही गैरसोय होते.

बस स्थानकातील खड्डे लवकरच भरण्यात येणार असून बाहेरील दिवेसुद्धा दोन चार दिवसात चालू होतील. सध्याचे स्थानक लवकरच वाडा आगारामध्ये चालू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवला आहे.
-मधुकर धांगडा, आगार व्यवस्थापक,वाडा

येत्या काही दिवसात वाड्यातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू होईल. त्यावेळी वाहतुकीचा प्रश्न आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे बस स्थानक वाडा आगाराच्या जागेत हलवणे अत्यंत आवश्यक आहे.
—अनंता वणगा, सामाजिक कार्यकर्ते, वाडा

First Published on: August 23, 2019 5:36 AM
Exit mobile version