शिवसैनिकांनी दिली भुजबळांना ‘लखोबा लोखंडे’ची उपमा

शिवसैनिकांनी दिली भुजबळांना ‘लखोबा लोखंडे’ची उपमा

मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आलेले बॅनर

राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याची शिवसेनेत परत येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून शिवसेनेतूनच बाहेर पडलेले छगन भुजबळ आहेत. मात्र छगन भुजबळ यांच्या सेनेत परत येण्याच्या चर्चेने शिवसैनिक काहीसे उद्विग्न झाले आहेत. याच भावनेतून त्यांनी ठिकठिकाणी बॅनरबाजी करून छगन भुजबळ यांना विरोध दर्शवण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची लवकरच घर वापसी होणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यावर काही शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या. रविंद्र तिवारी या शिवसैनिकाने तसे बॅनर मुंबईत अनेक ठिकाणी लावले आहेत. अगदी मातोश्री कलानगर, शिवसेना भवन, वरळी सी-लिंक, घाटकोपर, विक्रोळी परीसरात हे होर्डिंग लावण्यात आले आहेत.

काय आहे या बॅनरवर

छगन भुजबळांना पुन्हा शिवसेनेत प्रवेश नको. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भुजबळांनी जो त्रास दिला ते शिवसैनिक अजूनही विसरलेले नाही. अशा मजकूराचे हे होर्डिंग लावण्यात आले आहेत. त्यामुळे भुजबळ जर शिवसेनेत परत आले तर त्यांना शिवसैनिकांच्या नाराजीचा सामना करावा लागणार हे स्पष्ट आहे.

भुजबळांनी केली भूमिका स्पष्ट 

दरम्यान, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी, मी शिवबंधन बांधणार नाही हे स्पष्ट केले असून माझ्या सेना प्रवेशाची अफवा पसरवली जात आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष माजी मंत्री सचिन अहिर यांच्या सेना प्रवेशानंतर भुजबळ देखील सेनेत जाणार असल्याच्या चर्चा समाजमाध्यमांवर रंगू लागल्या होत्या. मात्र भुजबळांनी पत्रकार परिषदेमध्ये मी राष्ट्रवादीमध्येच राहणार असल्याचे सांगत या अफवांना पूर्णविराम दिला.

First Published on: July 26, 2019 8:44 AM
Exit mobile version