घरमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंचा वरळीतून आमदारकीचा मार्ग मोकळा

आदित्य ठाकरेंचा वरळीतून आमदारकीचा मार्ग मोकळा

Subscribe

सचिन अहिर भायखळ्यातून लढणार

शिवसेनेत प्रवेश करणार्‍या नेत्यांच्या हातावर नेहमी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे शिवबंधन बांधतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांच्या हातावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवबंधन बांधल्यामुळे वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार हे आता जवळपास निश्चित झाले. तर सचिन अहिर यांना भायखळा येथून उमेदवारी दिली जाऊ शकते. भायखळ्यात मागील निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार यशवंत जाधव यांचा एमआयएमचे उमेदवार वारिस पठाण यांनी पराभव केला होता. त्यामुळे यावेळी ती जागा सचिन अहिर यांना दिली जाणार असल्याचे सुत्रांकडून कळते. सचिन अहिर शिवसेनेत आल्यामुळे आता आदित्य ठाकरेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

वरळी मतदारसंघामध्ये स्वत:ची वेगळी ताकद असलेल्या सचिन अहिर यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याचे बोलले जात आहे. या मतदारसंघात जरी शिवसेनेचे सुनिल शिंदे आमदार असले तरी सचिन अहिर यांनीदेखील या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळेच या मतदारसंघात शिवसेनेची अधिक ताकद वाढवून आदित्य ठाकरे कसे सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून येतील याकडे शिवसेनेचा सर्वाधिक भर आहे. या सर्व गोष्टीचा विचार करूनच सचिन अहिर यांना शिवसेनेत प्रवेश दिल्याचे शिवसेनेच्या एका नेत्याने खासगीत बोलताना सांगितले.

- Advertisement -

मागील वर्षभरापासून आदित्य अहिरांच्या संपर्कात
दरम्यान आपलं महानगरला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे हे मागील वर्षभरापासूनच वरळी मतदारसंघासाठी तयारी करत असून, यासाठी आदीत्य ठाकरे मागील वर्षभरापासूनच सचिन अहिर यांच्या संपर्कात आहेत. वर्षभरापूर्वी आपली आणि आदित्य ठाकरे यांची एका हॉटेलमध्ये भेट झाल्याचेही सचिन अहिर यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केल्यानंतर सांगितले. आपण राष्ट्रवादीमध्ये मुंबई अध्यक्ष असताना आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली पण जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये भेटलो तेव्हा आदित्य यांनी तुम्ही तुमचे काम योग्य पद्धतीने करत असल्याचे सचिन अहिर यांनी प्रवेशानंतर सांगितले. तसेच आदित्य यांच्या कामानेही आपण प्रभावित झाल्याचे ते यावेळी म्हणालेत.

मला फोडलेली माणसे नको तर मनाने जिंकणारी माणसे हवीत. शिवसेनेची ताकद वाढत आहे. तसेच मला खात्री आहे सचिन अहिर यांना त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही.
– उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

- Advertisement -

सचिन अहिर यांच्या रुपाने एक चांगला नेता शिवसेनेला मिळाला आहे. त्यांच्या अनुभवाचा आम्हाला निश्चितच फायदा होईल.
– आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख

आदित्य ठाकरेंच्या कामाने मी प्रभावित झालो असून,कोणत्या जागेवरून कोणाला लढवले पाहिजे हा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्थान माझ्या हृदयात कायम आहे. पण यापलीकडे जाऊन काही निर्णय घ्यावे लागतात.
– सचिन अहिर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -