बेस्ट कर्मचार्‍यांच्या मागण्या रास्त, पण संप अयोग्य

बेस्ट कर्मचार्‍यांच्या मागण्या रास्त, पण संप अयोग्य

बेस्ट समितीच्या आजी-माजी अध्यक्षांच्या भावना

बेस्ट कामगारांनी सोमवारी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईकरांना होणार्‍या या त्रासाला नक्की कोण जबाबदार आहे याबाबत आरोप-प्रत्यारोप होत असला तरी बेस्टच्या माजी अध्यक्षांना या संपाबाबत काय वाटतेय हे आपलं महानगरने जाणून घेतले. संपाबाबत वेगळावेगळ्या प्रतिक्रिया आणि संताप व्यक्त केला जात असला तरी माजी अध्यक्षांनी मात्र कामगारांच्या मागण्या योग्य असल्याचे म्हटले आहे. सन २००८मध्ये केलेल्या संपात आणि सध्या सुरू असलेल्या संपात फरक आहे. सध्या कामगारांनी पुकारलेला संप हा न्यायहक्कासाठी आहे. मात्र, हे जरी खरे असले तरी बेस्टचा विचार करता संप पुकारणे हा एकमेव मार्ग नसल्याच्या प्रतिक्रिया माजी अध्यक्षांनी व्यक्त केल्या आहेत.

बेस्ट कर्मचार्‍यांनी ज्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे, त्या मागण्या रास्त आहेत. त्या चुकीच्या नाहीत. उपक्रमात काम करणार्‍या कामगारांचे संसार पगारावर चालतात. आपल्या हक्कांसाठी त्यांना रस्त्यावर उतरावे लागले. रोज रोज मरण्यापेक्षा एकदाचाच काय तो सोक्षमोक्ष लावण्यासाठी नाईलाजास्तव कर्मचार्‍यांनी उचललेले हे पाऊल आहे. पण, हे करताना कामगार संघटनांनी मुंबईकरांना वेठीस धरू नये, हे माझे मत आहे. २००८ साली आणि आता होत असलेल्या संपात फरक आहे. २००८ च्या संपाचा मी साक्षीदार आहे. त्यावेळी वेतन करार झाला होता. कामगार आणि संघटनांना आम्ही सर्व देत होतो. परंतु, कामगार संघटनांनी आपली हुकूमत गाजवण्यासाठी संप पुकारला होता. आपल्या अस्तित्वासाठी तेव्हाचे आंदोलन झाले होते. त्यामुळे तो संप एक दिवसात मोडीत काढला होता.
– संजय पोतनीस, माजी बेस्ट समिती अध्यक्ष, आमदार

हा संप अयोग्य आहे. मुंबईकरांना वेठीस धरून केलेल्या संपाचे समर्थन आम्ही करू शकत नाही. उत्तम खोब्रागडे यांनी ज्या प्रमाणे २००८ साली झालेल्या संपाच्या वेळी जे कठोर पाऊल उचलले होते, तसे या संपकरी कामगार संघटनांविरोधात उचलून त्यांना कायमचाच बाहेरचा रस्ता दाखवला गेला पाहिजे. त्यांच्यावर बंदी घातली जावी. मुंबईकरांना संप करून वेठीस धरणे योग्य नाही. संप केला जात असताना बेस्ट आणि महापालिकेने कोणतीही पर्यायी व्यवस्था केली नाही. त्यामुळे गेले दोन दिवस मुंबईकर त्रस्त आहेत.
– प्रवीण छेडा, माजी बेस्ट समिती अध्यक्ष

नगरसेवक असताना महापालिका अर्थसंकल्पावर भाषण करताना आपण महापालिका अर्थसंकल्पात बेस्टसाठी तरतूद करावी अशी मागणी केली होती. बेस्ट हा महापालिकेचा अंगिकृत भाग आहे. तो तोट्यात आहे. त्यामुळे बेस्टसाठी काही करायला हवे, ही आपली पहिल्यापासून मागणी होती. बेस्टच्या संपात सर्वच जण सहभागी झाले आहेत. कामगारांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्यामुळे संपाबाबत आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही. बेस्ट कामगारांबाबत मला सहानुभूती आहे. बेस्ट अध्यक्ष म्हणून बेस्टच्या कामगारांशी संबंध आला. पण, बेस्ट परिवहन सेवा ही मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आज ज्येष्ठ नागरिक आणि तरुण मुले हे दोन वर्ग असे आहेत जे बेस्टला सोडू शकणार नाहीत. बेस्टची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे कामगारांनी आर्थिक परिस्थितीचा विचार करून निर्णय घ्यायला हवा. आंदोलन करून मार्ग निघणार नाही. निवडणुका आहेत म्हणून आंदोलन केले जात आहेत. पण, आंदोलनामुळे नव्हे तर समझोत्यातूनच मार्ग निघू शकतो.
– दिलीप पटेल, माजी बेस्ट समिती अध्यक्ष

बेस्टची आर्थिक स्थिती ही आजची नाही. गेल्या ३ ते ४ वर्षातील बेस्टच्या अर्थसंकल्पाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास लक्षात येईल. बेस्ट ही काही उत्पन्नाचे स्रोत असलेली संस्था नाही. त्यामुळे बेस्टला राज्य सरकारने आर्थिक मदत करायला हवी. मुंबई महापालिका आर्थिक मदत करत आहेच. पण, त्यांच्यावरही मर्यादा आहेत. महापलिकेचे जे आयुक्त असतात ते शासन नियुक्त असतात. ते आपापल्या परीने निर्णय घेतात. त्यांना बेस्टला मदत करण्यासाठी आवश्यक परवानगी आणि निर्देश दिले जावेत. बेस्ट कामगार १२ तास सेवा करत आहेत. त्यांना त्यांचा हक्क मिळायलाच हवा. शासनाने विनाअट बेस्टला मदत करायला हवी. शिवसेनेची सत्ता आहे म्हणून राजकारण होऊ नये. मुंबईकरांप्रती सहानुभूती शासनाने दाखवायला हवी. बेस्टचा आर्थिक डोलारा सांभाळण्याची ताकद शासनाने द्यायला हवी. बेस्ट ही मुंबईची जीवनवाहिनी आहे आणि विद्यार्थी, कामगार यांना टोकाची भूमिका घेत बेस्ट कामगारांनी वेठीस धरू नये. महापालिका आपले कर्तव्य पार पाडतच आहे. पण, शासनानेही बेस्ट मदत करत कर्तव्य पार पाडायला हवे.
– सुनील शिंदे, माजी बेस्ट समिती अध्यक्ष

कुठल्याही परिस्थितीत मुंबईकरांचे हाल होऊ नये, तसेच त्यांना वेठीस धरू नये. बेस्टची आर्थिक स्थिती योग्य नाही. दिवसेंदिवस बेस्ट प्रवासी कमी होत आहेत. बेस्टचे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे बेस्ट कर्मचार्‍यांनी या आर्थिक स्थितीचा विचार करता जबाबदारी ओळखून काम करायला हवे. आजही बेस्टचे चालक बस थांब्याच्या पुढे जाऊन बस थांबवतात. वेळेवर बस येत नाही. यामुळे कुठेतरी प्रवाशांनी पाठ फिरवल्यामुळे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे सेेवेत सुधारणा व्हायला हवी.
– अरविंद नेरकर, माजी बेस्ट समिती अध्यक्ष

First Published on: January 11, 2019 1:15 AM
Exit mobile version