शहापूर वेहळोलीत बर्ड फ्ल्यूचा कहर तीनशेहून अधिक कोंबड्या दगावल्या

शहापूर वेहळोलीत बर्ड फ्ल्यूचा कहर तीनशेहून अधिक कोंबड्या दगावल्या

शहापूर तालुक्यातील वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीच्या फार्ममध्ये गेल्या काही दिवसांत ३०० हून अधिक कोंबड्या बर्ड फ्ल्यूने दगावल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने येथील एक किलोमीटर परिघातील किमान १५ हजारांहून अधिक पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची मोहीम तात्काळ हाती घेतली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

वेहळोली (वासिंद) येथे मुक्तजीवन सोसायटी असून या सोसायटीच्या शेडमधील देशी कोंबड्या आणि बदकांचा अचानक मृत्यू होत होता. याबाबत मुक्तजीवन सोसायटीने वासिंद येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात कळविले. त्यानुसार पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, उपचारानंतरही कोंबड्या दगावत असल्याने मृत कोंबड्यांचे विच्छेदनाचे व जिवंत कोंबड्यांच्या रक्ताचे नमुने पुणे येथील रोग अन्वेषण विभागाकडे तपासणीसाठी ११ फेब्रुवारीला पाठविण्यात आले.

त्याबाबतच्या अहवालामध्ये बर्ड फ्ल्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अजित हिरवे व डॉ. जी. जी. चांदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सहाय्यक आयुक्त डॉ. अमोल सरोदे, शहापूर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दर्शन दळवी यांच्यासह ७० जणांच्या पथकाने वेहळोली येथील मुक्तजीवन सोसायटीमध्ये गुरुवारी धाव घेतली. त्यादरम्यान मुक्तजीवन सोसायटीच्या शेडमधील सर्वच कोंबड्या दगावल्या असून लगतच्या शेडमधील किमान १०० कोंबड्या व काही बदके सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, बाधित क्षेत्रापासून एक किमी च्या परिघात असलेल्या पोल्ट्री फार्ममधील पक्षी तसेच पक्षी खाद्य व अंडी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची मोहीम पशुसंवर्धन विभागाने हाती घेतली आहे. बधितक्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघातील चिकन विक्रेते, वाहतूकदारांचे दैनंदिन कामकाज रोखण्याबाबतही ठाणे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत. दरम्यान, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे.

First Published on: February 18, 2022 7:48 AM
Exit mobile version