बर्ड फ्लू हा माणसांचा आजार नाही

बर्ड फ्लू हा माणसांचा आजार नाही

बर्ड फ्लूचा ठाण्यात ही शिरकाव

कोरोना पाठोपाठ राज्यामध्ये बर्ड फ्लूचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु बर्ड फ्लूला घाबरण्याचे गरज नाही, कारण बर्ड फ्लू हा माणसाचा आजार नसून, पक्ष्यांचा आजार आहे. हा आजार पक्ष्यांंनाच हानीकारक आहे. त्यामुळे पक्ष्यांचाच मृत्यू होऊ शकतो. चिकन आणि अंडी ८० डिग्रीपर्यंत शिजवून खाल्यास त्याचा मानवाला काहीही धोका नाही,असे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित रानडे यांनी सांगितले.

डॉ. अजित रानडे यांचा सल्ला

केरळ, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि हरयाणा या राज्यांपाठोपाठ आता महाराष्ट्रामध्ये बर्ड फ्लू फैलाव होऊ लागला आहे. बर्ड फ्लूमुळे परभणीमध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर लातूर, सांगली, बीड, रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईमध्येही बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. बर्ड फ्लूमुळे मोठ्या प्रमाणात कोंबडी, बदके व कावळ्यांचा मृत्यू होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोंबडी व अंडी खाल्ल्याने लोकांना बर्ड फ्लू होत असल्याच्या अफवा पसरत असल्याने नागरिकांमधील भीतीला अधिकच खतपाणी घातले गेले आहे. परंतु नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. बर्ड फ्लू हा पक्ष्यांचा आजार असून, माणसांचा आजार नाही. या रोगाने पक्षीच मरणार आहेत. बर्ड फ्लू विषाणूच्या जनुकांमध्ये बदल घडले तरच हा रोग माणसांमध्ये येऊ शकतो. हे बदल घडण्यासाठी त्यावर रासायनिक प्रक्रिया करणे आवश्यक असते. मात्र जनुकीय बदल झाल्यानंतर ते कोणते गुणधर्म धारण करतात हे ठरवणे शक्य नाही. जनुकीय बदलानंतर विषाणूची शक्ती कमी होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे बर्ड फ्लूमुळे माणसाला कोणताही धोका नसल्याचे डॉ. अजित रानडे यांनी ठामपणे सांगितले.
कोंबडी व अंडी खाल्याने माणसाला बर्ड फ्लू होऊ शकतो, अशी माहिती सध्या मोठ्या प्रमाणात पसरत आहे. बर्ड फ्लूचे विषाणू हे 70 ते 80 डिग्री सेल्सिअस तापमानाला नष्ट होतात. भारतामध्ये कोणताही खाद्यपदार्थ हा उत्तमरित्या शिजवून खाल्ला जातो. मटण, चिकन व अंडी ही साधारणपणे 100 डिग्री सेल्सियस तापमानाला उकळवली जातात. त्यामुळे या तापमानाला बर्ड फ्लूचे विषाणू नष्ट होतात. परिणामी चिकन, अंडी यातून बर्ड फ्लूचे विषाणू आपल्या शरीरात जाणे अशक्य असल्याचेही त्यांनी सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार मागील पाच वर्षांमध्ये जगभरामध्ये 4५ लोकांना बर्ड फ्लूची लागण झाली होती. यामध्ये इजिप्त 39, इंडोनेशिया 2 आणि चीनमध्ये एका बाधिताचा समावेश आहे. परंतु या देशांमध्ये बहुतांश अन्न हे अर्धे शिजलेले किंवा कच्चे खाल्ले जात असल्यामुळेच त्यांना बर्ड फ्लूची लागण झाली, असे डॉ. रानडे यांनी सांगितले.

जैविक सुरक्षा महत्त्वाची

स्थलांतरित पक्ष्यांतून बर्ड फ्लूचा फैलाव होतो. त्यामुळे कावळे, चिमण्या, बदके, घार, साळुंख्या अशा स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांना पोल्ट्री फार्ममध्ये येण्यापासून रोखल्यास कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये याचा फैलाव होणार नाही. त्याचबरोबरच जैविक सुरक्षेला महत्त्व देत कुक्कुटपालन क्षेत्रात साफसफाई, निर्जंतुकीकरण, आयसोलेशनची व्यवस्था ठेवल्यास पोल्ट्री फार्म व्यावसायिकांचे नुकसान कमी होण्याची शक्यता आहे.

मृत पक्षी आढळल्यास काय कराल

आपल्या भागामध्ये पक्षी मृत अवस्थेत आढळल्यास तातडीने पशुसंवर्धन विभागाशी किंवा आपल्या जवळील पशुवैद्यकीय रुग्णालयाशी नागरिकांनी सपर्क साधावा. विभागाचे कर्मचारी तेथे येऊन त्या पक्षांचे नमुने घेऊन त्यांची विल्हेवाट लावतील. तसेच नमुने तपासणीसाठी पुणे किंवा भोपाळमधील प्रयोगशाळेत पाठवतील. जेणेकरून पक्ष्यांचा मृत्यू कशामुळे झाला आहे, हे स्पष्ट होईल.

First Published on: January 12, 2021 9:28 PM
Exit mobile version