महापालिकेत उंदीर मारण्याच्या कामात घोटाळा, न्यायालयात घेणार धाव – भाजप

महापालिकेत उंदीर मारण्याच्या कामात घोटाळा, न्यायालयात घेणार धाव – भाजप

मुंबई महापालिकेत उंदीर मारण्याच्या कामासाठी १ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र हा खर्च कुठे, किती, कसा काय केला याबाबत माहिती दडवून ठेवल्याने या कामात घोटाळा झाला आहे. करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे, असा गंभीर आरोप भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. तसेच, महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने घोटाळा करण्याची एकही जागा शिल्लक ठेवली नसल्याची टीका करीत भाजप गटनेते शिंदे यांनी शिवसेना आणि स्थायी समिती अध्यक्षांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र याप्रकरणी गरज पडल्यास न्यायालयात धाव घेऊन दाद मागण्यात येईल, असा इशाराही त्यांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.

शुक्रवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर उंदीर मारण्याच्या प्रस्तावात कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. एक उंदीर मारण्यासाठी २० रुपये तर ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक उंदीर मारल्यास प्रत्येक उंदीरमागे २२ रुपये दर देण्यात आले आहेत. केवळ ५ वॉर्डमध्ये १ कोटी रुपये खर्च करून उंदीर मारल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. या प्रस्तावामध्ये मूषक संहारक पथकाने नेमके कुठे कुठे आणि किती उंदीर मारले? त्यांची विल्हेवाट कशी लावली? त्यांची उत्पत्तीस्थाने काय होती? कायमस्वरूपी नेमक्या उपायोजना काय केल्या? याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती पालिकेने दिलेली नाही, असा आरोप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८च्या कलम ६९ (क) आणि कलम ७२ अंतर्गत महापौर, महापालिका आयुक्त जो खर्च करतात त्यामध्ये वारंवार त्रुटी असल्याचे मागील काही दिवसात सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावरून आढळून आले आहे. याबाबत पालिकेतील भाजप नगरसेवकांनी वारंवार आवाज उठवला. अनेकवेळा त्रुटी दाखवून दिल्या आहेत. त्यानंतर सत्ताधारी आणि प्रशासनाने त्याबाबत दिलगिरीही व्यक्त केली आहे. तरीही वारंवार आर्थिक बाबींशी संबंधित या कलमांचा फायदा घेऊन सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे. त्यामुळे भाजपने अशा प्रस्तावांबाबत आक्षेप घेऊनही सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्रशासन दाद देत नाही. तसेच, असे प्रस्ताव मंजुरी घेणे थांबवत नाही, असे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. जर यापुढे असले प्रकार थांबले नाहीत तर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि प्रसंगी न्यायालयात धाव घेईल, असा इशाराही गटनेते प्रभाकर शिंदे यांनी यावेळी दिला. मात्र स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सदर प्रस्ताव राखून ठेवला आहे.


हेही वाचा – BMC Election 2022: मुंबईत शिवसेना एकहाती सत्ता स्थापन करणार; अनिल परब यांचा दावा


 

First Published on: February 11, 2022 9:55 PM
Exit mobile version