कल्याणमध्ये भाजपच्या तर भिवंडीत सेनेच्या मदतीवर एकमेकांचे भवितव्य अवलंबून

कल्याणमध्ये भाजपच्या तर भिवंडीत सेनेच्या मदतीवर एकमेकांचे भवितव्य अवलंबून

पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण

लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाली असली तरीसुध्दा स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजपतील अंतर्गत वाद कमी झाल्याचे दिसून येत नाही. भिवंडीत खासदार कपिल पाटील यांच्या विषयी शिवसेनेच्या गोटात नाराजी असल्याने सेनेतील एक गट बंडखोरीच्या तयारीत आहेत. तर कल्याणमध्येही शिवसेनेच्या मनमानी कारभाराविषयी भाजपमध्ये नाराजी आहे. कल्याणमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण असं दोन सत्ता केंद्र आहेत. त्यामुळे भिवंडी आणि कल्याणात एकमेकांच्या मदतीवरच दोघांचाही विजय अवलंबून आहे, अशी सध्याची स्थिती आहे.

सेना-भाजपमधील वाद चव्हाट्यावर

भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजपचे खासदार कपिल पाटील हे खासदार आहेत. भिवंडीपासून ते शहापूर कसारापर्यंत हा मतदार संघ विभागला गेला आहे. त्यामुळे आगरी, मुस्लीम आणि कुणबी समाजाची वस्ती असा संमिश्र लोकवस्तीचा हा मतदार संघ आहे. या मतदार संघात शिवसेनेचेही वर्चस्व आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला शह देण्याचे काम भाजपने केले. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे शिवसेना नाराज झाली होती. त्यामुळे पंचायत समितीची निवडणूक असो वा कृषी समिती शिवसेना व भाजपमधील वाद नेहमीच चव्हाट्यावर आला आहे. सध्या शिवसेना भाजपमध्ये वाद आहेत. खासदार कपिल पाटील यांना मदत करणार नसल्याची भूमिका शिवसेनेने उघडपणे जाहीर केली आहे. त्यामुळे खासदारांना शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागत आहे. भाजपविरोधात दंड थोपटण्याच्या हालचाली शिवसेनेत सुरू आहेत. कल्याण लेाकसभा मतदार संघातही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या फटकळ स्वभावामुळे अनेक कार्यकर्ते नाराज आहेत.

सेनेवर भाजपची मंडळी नाराज

महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता आहे. मात्र शिवसेना भाजपमधील अंतर्गत वादही नेहमीच चव्हट्यावर आला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारल्याशिवाय महासभेतील प्रस्तावही मंजूर होत नाही, अशी अवस्था आहे. डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पार्किंग प्लाझाच्या कॉम्पलेक्समध्ये रिक्षा स्टँन्ड हलविण्यासाठी डोंबिवलीचे आमदार तसेच राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे आग्रही आहेत. तसे आदेशच त्यांनी संबधित यंत्रणाला दिले होते. मात्र चव्हाणांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली गेली आहे. बेसमेंटमध्ये रिक्षा हलिवण्याच्या प्रस्ताव स्थायी समितीने दुस यांदा स्थगित ठेवला. स्थायी समितीवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे राज्यमंत्री चव्हाणांना शिवसेनेकडून शह दिला जात असल्याने भाजपमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे भिवंडीप्रमाणे कल्याणातही शिवसेनेवर भाजपची मंडळी नाराजी आहेत.

First Published on: March 26, 2019 9:33 PM
Exit mobile version