राजकारणामुळे रंगली भाजपाची पाणी परिषद

राजकारणामुळे रंगली भाजपाची पाणी परिषद

Rajendra gavit

मोठी प्रसिद्धी करून आयोजित करण्यात आलेली भाजपाची पाणी परिषद सोशल मीडियावरील टीकेमुळे चांगलीच रंगली. वसईला पाणी देण्यास विरोध करणार्‍या गावितांनी मतांच्या राजकारणासाठी भूमिका बदलल्याची चौफेर टीका करण्यात आली होती.20 लाख वसईकरांना मुबलक पुरवठा होईल इतके पाणी भाजपा सरकारच्या निधीमुळे उपलब्ध झाले आहे. त्याचे श्रेय स्थानिक सत्ताधारी घेत आहेत. दरडोई 130 लिटर पाणी मिळू शकत असतानाही सत्ताधार्‍यांनी टँकर लॉबी पोसण्यासाठी गेल्या पाच वर्षांत नवीन नळ कनेक्शन दिले नाही. फक्त आपले कार्यकर्ते आणि मतदारांनाच पाणी देण्यात येत आहे. यापुढे हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा देवून, मागेल त्याला पाणी मिळालेच पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन भाजपाने 2 डिसेंबरला सायंकाळी नालासोपारात पाणी परिषदेचे आयोजन केले होते. त्यासाठी खासदार तथा माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. तसेच सोशल मीडिया आणि होर्डींग्जद्वारे जोरदार प्रसिद्धीही करण्यात आली होती.

मात्र,ही प्रसिद्धी भाजपाच्याच अंगलट आल्याचे सोशल मीडियावरून गावितांवर करण्यात आलेल्या टीकेवरून स्पष्ट झाले. परिषद होण्यापूर्वीच गावित सोशल मीडियावर ट्रोल झाले. वसई-विरार उप- प्रदेशाला सुर्या धरणाचे पाणी देण्यात येऊ नये, यासाठी पालघरमध्ये झालेल्या प्रत्येक आंदोलन, उपोषणात गावित आघाडीवर होते.आता तेच वसईला पाणी देण्यात यावे म्हणून पुढाकार घेत असल्याचे सोंग करीत असल्याची टीका सोशल मीडियावरून करण्यात आली होती. त्यासाठी तत्कालीन आंदोलनांचे फोटे, वर्तमानपत्रातील बातम्यांच्या कटिंग आणि मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाच्या प्रतीही पुरावा म्हणून टाकण्यात आल्या होत्या.

First Published on: December 5, 2018 5:21 AM
Exit mobile version