काँग्रेसच्या विरोधामुळेच मुंबईकरांवरील मालमत्ता करवाढ रद्द; भाई जगतापांचा दावा

काँग्रेसच्या विरोधामुळेच मुंबईकरांवरील मालमत्ता करवाढ रद्द; भाई जगतापांचा दावा

मुंबईकरांवर कोरोनाचे संकट असताना मालमत्ता करवाढ लादण्याचा मुंबई महापालिकेने प्रयत्न केला. मात्र, काँग्रेसने स्थायी समितीच्या बैठकीत सदर प्रस्तावाला कडाडून विरोध केल्यामुळेच मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव रद्द करावा लागला, असा दावा काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी केला आहे. तसेच मुंबईकरांच्या हिताविरोधातील कोणत्याही प्रकारच्या प्रस्तावाला काँग्रेस कडाडून विरोध करणारच असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, सरचिटणीस संदेश कोंडविलकर आणि सह-कोषाध्यक्ष अतुल बर्वे उपस्थित होते.

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत भाजपने राज्यातील सत्तेचा अपलाभ घेऊन स्वतःच्या फायद्यासाठी प्रभागांची फेररचना केली होती आणि त्यांना किमान ५० जागांचा फायदा झाला होता. त्यामुळे काँग्रेसतर्फे पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आगामी म्हणजे फेब्रुवारी २०२२ च्या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा या प्रभागांची फेररचना करण्याची मागणी केली होती.

त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवून पालिका निवडणुकीपूर्वी किमान ५० प्रभागांची पुनर्रचना करण्याची जोरदार मागणी केली होती. त्याची दखल घेऊनच निवडणूक आयोगाने रवी राजा यांची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता प्रभागांची फेररचना नक्कीच होईल, असे सांगतानाच भाजपने त्यांच्या निवडून आलेल्या ८२ जागा यापुढील निवडणुकीत वाचवून दाखवाव्यात, असे आव्हान भाजपला दिले आहे.

त्याचप्रमाणे बेस्टच्या डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०२० या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युटीचे पैसे अद्याप देण्यात आलेले नाहीत. बेस्ट आर्थिक संकटात आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने त्या कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी बेस्टला ४०६ कोटी रुपयांचे कर्ज न देता ती रक्कम अनुदान म्हणून द्यावी, अशी मागणीही भाई जगताप यांनी यावेळी केली.

नालेसफाईची कामे १०० टक्क्यांपेक्षाही जास्त झाल्याचा पालिकेचा दावा खोटा असून प्रत्यक्षात २० टक्के एवढीच नालेसफाई झाली आहे. या नालेसफाईच्या कामांत अधिकारी व कंत्राटदार यांनी मिळून मोठा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोपही यावेळी भाई जगताप यांनी केला.

First Published on: June 28, 2021 10:04 PM
Exit mobile version