मुंबईतील रस्त्यांची कामे रखडण्याची नगरसेवकांना भीती

मुंबईतील रस्त्यांची कामे रखडण्याची नगरसेवकांना भीती

मेट्रोसाठी बोरीवली-दहिसरमधील लिंकरोडवरील जलवाहिनी बाधित

मुंबईतील रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने महापालिका प्रशासनाने आता निविदा अटींमध्ये बदल करत कंत्राटदारांकडून ४० टक्के अनामत रक्कम रोखून ठेवण्याची अट घातली आहे. हमी कालावधी संपुष्टात येईपर्यंत ही रक्कम महापालिकेकडेच राहणार असून परिणामी कंत्राटदारांनी निविदा या २० ते ४० टक्के अधिक दराने बोली लावत भरल्या आहेत. त्यामुळे अधिक दराने बोली लावल्यामुळे या निविदाच रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेत फेरनिविदा मागवणार आहे. परिणामी मुंबईतील रस्त्यांची कामे या वर्षीही होणार नसल्याची भीती स्थायी समिती सदस्यांनी वर्तवली आहे.

काही अधिकार्‍यांचे कंत्राटदारांशी हितसंबंधक गुंतलेत का?

स्थायी समितीच्या बैठकीत भाजपचे प्रभाकर शिंदे यांनी हरकतीच्या मुद्दयाद्वारे मुंबईतील रस्ते कामांबाबत भीती व्यक्त केली आहे. सप्टेंबर महिन्यात मागवलेल्या निविदा आता डिसेंबर महिना आला तरी अंतिम केल्या जात नसल्याचे सांगत अनेक भागांमधील रस्त्यांच्या निविदा अधिक बोली लावल्यामुळे उघडल्याच नसल्याचे सांगितले. त्यामुळे काही अधिकार्‍यांचे कंत्राटदारांशी हितसंबंधक गुंतलेत का? असा संशय व्यक्त करत तीन महिन्यांनंतरही प्रशासन कोणत्याही निर्णयाप्रत गेलेला नाही.

आयुक्त पावला पावलाला धोरण बदलत असल्याचा केला आरोप

या निविदांमध्ये हमी कालावधीतील संपुष्ठात येईपर्यंत ४० टक्के रक्कम रोखून ठेवण्याची अट घालण्यात आली. त्यामुळे एक कोटींच्या कामांसाठी कंत्राटदारांनी दीड कोटींसाठी बोली लावल्या आहेत. ज्या रस्त्यांच्या कामांसाठी परवानगी घेतलेल्या आहेत, त्या रस्त्यांच्या निविदा जर पुन्हा मागवल्या तर अधिक कालावधी लोटला जाईल. परिणामी नियोजित कालावधीत ही कामे होणार नसल्याचे सांगत रस्ते विकासाची कामे रखडली जातील, अशी भीती वर्तवली जाईल. याला सपाचे रईस शेख यांनी पाठिंबा देत आयुक्त पावला पावलाला धोरण बदलत असल्याचा आरोप करत आहे. सकाळी असलेले धोरण संध्याकाळी बदलते आणि त्याप्रमाणे नवीन धोरणाची अंमलबजावणी करायला लावली जाते. निविदा मंजूर करणारे आयुक्त आणि त्यात बदल करणारेही आयुक्तच मग कंत्राटदारांनी अधिक बोली लावल्या म्हणून त्या रद्द का केल्या जातात असा सवाल रईस शेख यांनी केला.

रस्त्यावर खड्डे प्रकरण निर्माण झाल्यानंतर निविदांमध्ये बदल

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी रस्ते निविदांसाठी एकच धोरण बनवावे, त्यात वारंवार बदल करणे योग्य नाही, असे सांगत मुंबईत यावर्षी ९५० कोटी रुपयांचे ३६० रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार होती. परंतु हमी कालावधीतील रस्त्यावर खड्डे प्रकरण निर्माण झाल्यानंतर निविदांमध्ये बदल केला जात आहे. तर बोरीवलीतील भाजपचे नगरसेवक विद्यार्थी सिंह यांनी रस्त्यांचे काम मंजूर झाले म्हणून आपण चिंचपाडा रोडवरील एका रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपुजन केले. परंतु भूमिपुजन केल्यानंतर हा रस्ता विकासासाठी हाती घेण्यात आल्याचे सांगितले, असा अनुभव सांगत विद्यार्थी सिंह यांनी बोरीवलीत ७० कोटी रुपये खर्च करत बनवण्यात येणार्‍या स्कायवॉकची निविदाही प्रशासनाने रद्द केल्याचे सांगितले. यावर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा मुद्दा गंभीर असून याची माहिती पटलावर ठेवण्यात यावी, असे निर्देश प्रशासनाला देत हरकतीचा मुद्दा राखून ठेवला.


हेही वाचा – रस्त्यावर खड्डे प्रकरण निर्माण झाल्यानंतर निविदांमध्ये बदल


 

First Published on: December 4, 2019 10:47 PM
Exit mobile version