BMC : मुंबईत हिवताप, डेंग्यूला आळा घालण्यासाठी पालिकेची तयारी, आयुक्त गगराणींनी घेतली बैठक

BMC : मुंबईत हिवताप, डेंग्यूला आळा घालण्यासाठी पालिकेची तयारी, आयुक्त गगराणींनी घेतली बैठक

मुंबईत हिवताप डेंग्यूला आळा घालण्यासाठी पालिकेची तयारी

मुंबई : मुंबईत हिवताप आणि डेंग्यू यांसारख्या आजारांचा वेळीच प्रतिबंध करण्यासाठी सर्व यंत्रणांचा एकत्रित सहभाग अपेक्षित आहे. पावसाळ्यापूर्वी विविध संस्थांच्या परिसरात असलेल्या पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही 15 मेपर्यंत पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. तसेच, विभाग पातळीवर विविध यंत्रणांनी सक्रियपणे सहभागी होत महापालिकेसोबत डास उत्पत्ती स्थानांची संयुक्त शोध मोहीम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणांना दिल्या. मात्र जबाबदारी पार न पडणाऱ्या संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. (BMC Commissioner Bhushan Gagrani held meeting of municipality to prevent winter fever and dengue)

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नागरी सेवा-सुविधा पुरवितानाच सार्वजनिक आरोग्याच्या अनुषंगाने नागरिकांना सेवा-सुविधा देण्यात येतात. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा भाग असलेल्या कीटकनाशक विभागाकडून पावसाळापूर्व तयारीसाठी उपाययोजनांना सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून, विविध शासकीय, निम-शासकीय, यंत्रणांचा समावेश असलेल्या डास निर्मूलन समितीची आढावा बैठक महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महापालिका मुख्यालयात मंगळवारी (ता. 16 एप्रिल) पार पडली. यावेळी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ यांच्यासह मुंबईतील विविध शासकीय, निम-शासकीय संस्था आणि प्राधिकरणांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा… गुरुवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

मुंबई शहर परिसरात काही विभाग हे डेंग्यू आणि हिवतापाचे हॉटस्पॉट ठरू शकतात. त्यामुळे अशा भागांमध्ये विविध यंत्रणा आणि महापालिकेच्या संयुक्त मोहिमेतून डास प्रतिबंधात्मक कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या. शाश्वत विकास ध्येय 3.3 (SDG) च्या 2030 पर्यंतच्या उद्दिष्टानुसार मुंबईत हिवताप निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच देशपातळीवर हिवताप निर्मूलनाच्या मोहीम 2030 च्या उद्दिष्टाअंतर्गत हिवताप मुक्त परिसर करण्याचे उद्दिष्ट मुंबईसाठी ठरवण्यात आले आहे. मागील वर्षी म्हणजेच 2023मध्ये हिवताप आणि डेंग्यूच्या रूग्णांचा आकडा पाहता यंदा अधिक प्रभावीपणे उपाययोजना करण्याची गरज आहे. त्यामध्ये शहरी भागातील विविध यंत्रणांचा सक्रिय सहभाग ही रूग्णसंख्या कमी करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी सांगितले.

22.23 टक्के पाण्याच्या टाक्या बंद…

कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ यांनी, डास निर्मूलनासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, त्यांची सद्यस्थितीचे सादरीकरण केले. याबाबत ते म्हणाले की, मुंबईतील विविध शासकीय, निम-शासकीय 67 यंत्रणांच्या परिसरात मिळून एकूण 29 हजार 19 पाण्याच्या टाक्या आहेत. त्यापैकी 22 हजार 568 पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी डास प्रतिबंधक कार्यवाही केली आहे. तर सहा हजार 451 पाण्याच्या टाक्यांच्या ठिकाणी उपाययोजना प्रलंबित आहेत. पावसाळापूर्व कामांमध्ये विविध संस्थांच्या परिसरात पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही 77.77 टक्के पूर्ण झाली आहे, असे त्यांनी नमूद केले. तर 22.23 टक्के पाण्याच्या टाक्याच्या ठिकाणी डास प्रतिबंधक कार्यवाही करण्याची गरज आहे.

तसेच, यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये हिवताप (मलेरिया), डेंग्यू व तत्स‍म आजारांना प्रतिबंध म्हाणून महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व कीटकनाशक विभागाने नियमित उपाययोजना हाती घेतल्या असून त्यांची अंमलबजावणी वेगाने सुरू आहे. विविध यंत्रणांच्या भागात पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधित करण्याची मोहीम आणखी वेगाने राबविण्यात येत आहे, असे कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ यांच्याकडून सांगण्यात आले.

कीटकनाशक विभागाच्या उपाययोजना…

मुंबई महापालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी डास प्रतिबंधाच्या अनुषंगाने पावसाळापूर्व कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक स्थितीत करणे, अडगळीतील वस्तू निष्कासित करणे इत्यादी कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच डासांच्या उत्पत्ती स्थानांमध्ये पाण्याच्या टाक्या, टायर, इतर वस्तू, पेट्री प्लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट इत्यादी ठिकाणीही कार्यवाही अपेक्षित आहे. याबाबतच्या सूचनाही विभागीय पातळीवर देण्यात आल्या आहेत.

गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये कीटकनाशक विभागाकडून तपासणी करण्याच्या तसेच पदाधिकाऱ्यांना किंवा मालकांना त्यांच्या वास्तू परिसरात डेंग्यू, हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून अळीनाशकांची फवारणी केली जात आहे. तसेच बांधकाम कामगारांच्या राहत्या जागेतही भिंतींवर इन्डोअर रेसिड्यूल स्प्रेइंग (आयआरएस) कीटकनाशकांची फवारणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा… Mumbai School : मुंबईतील शाळांमध्ये आरटीईअंतर्गत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

झोपडीवासियांच्या भागात पाण्याच्या टाक्या झाकून ठेवण्याबाबत तसेच अडगळीतील जागेच्या वस्तू शोधून निष्कासित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच डेंगी आणि चिकुनगुनिया प्रसारक (एडिस) डासांच्या सर्वेक्षणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. कीटकनाशक विभागाचे अधिकारी, कर्मचारी व कामगार यांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती आढळणाऱ्या ठिकाणी धूम्रफवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


Edited By : Poonam Khadtale

First Published on: April 17, 2024 9:56 AM
Exit mobile version