मुंबईकरांनो सावधन! दिल्लीतील करोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांचे आवाहन

मुंबईकरांनो सावधन! दिल्लीतील करोनाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांचे आवाहन

ऑमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वतोपरी दक्षता घ्या, आयुक्त डॉ. इक्बाल सिंह यांच्या सूचना

दिल्लीत सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असून या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिल्लीतील व्हिडिओ शेअर करत मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. आयुक्तांनी मुंबईकरांना सतर्क राहण्याचे आवाहन करून ‘स्वत:ला जपा, काळजी घ्या, नियमांचे पालन करा’, अशा सूचना केल्या आहेत. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावणाऱ्या शहीद भगतसिंह ट्रस्टच्या दोन स्वयंसेवकांच्या व्हिडिओचा दाखला देत आयुक्तांनी हे आवाहन केले आहे. दिवाळीनंतरचा हा व्हिडिओ आहे. दिल्लीत दिवाळीनंतर कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर झाली असल्याचे हे दोन स्वयंसेवक सांगत आहेत. उपचारांसाठी लोकांना खाटा मिळत नाहीत. काही महिन्यांपूर्वी इटलीमध्ये जी स्थिती होती, ती स्थिती सध्या दिल्लीत आहे. मृतांचे केवळ रुग्णालयातील आकडे बाहेर येत आहेत. पण घरात विलगीकरण असलेल्यांपैकी अनेकांचे बळी गेले आहेत, असे हे स्वयंसेवक सांगताना दिसत आहेत.


या व्हिडिओचा संदर्भ देत आयुक्तांनी मुंबईकरांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ‘दिल्लीतील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यामुळे आपण खूप काळजी घेतली पाहिजे. स्वत:ला सुरक्षित ठेवले पाहिजे. सुरक्षित अंतर आणि ‘नो मास्क, नो एन्ट्री’ हे तत्वच आपल्या सर्वांना कोरोनापासून वाचवू शकते. त्यामुळे मास्क वापरण्याचे महत्त्व आपण सर्व नागरिकांना पटवून देऊया आणि आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचवूया’, असं आवाहन आयुक्तांनी केलं आहे. आपण हे करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. कोरोनाची दुसरी लाट कधीही धडकण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे मुंबई महापालिका दक्ष असून सर्व प्रकारची काळजी घेतली जात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

First Published on: November 20, 2020 9:37 PM
Exit mobile version