‘ई’ विभागाचे सहाय्यक आयुक्त दुसऱ्यांदा बदलले

‘ई’ विभागाचे सहाय्यक आयुक्त दुसऱ्यांदा बदलले

मुंबई महानगरपालिका

महापालिकेच्या ‘ई’ विभागाच्या सहायक आयुक्त अलका ससाणे यांची बदली करून त्यांच्या जागी नवीन सहायक आयुक्त मृदुला अंडे यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु दोनच दिवसांमध्ये त्यांची बदली बाजार विभागाच्या सहायक आयुक्तपदी केली आहे आणि ‘ई’ विभागाच्या सहायक आयुक्तपदी मकरंद दगडखैर यांनी नियुक्ती केली आहे. तर ‘डि’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे ‘ई’ विभागाचाही प्रभारी भार कायम ठेवला आहे. मात्र, या विभागात सहायक आयुक्त म्हणून मालमत्ता विभागाचे केशव उबाळे यांची नियुक्ती न करता आयुक्त नवख्या आयुक्तांची नियुक्ती करून काय साध्य करत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तीनच दिवसांमध्ये अंडे यांची बदली करून…

मुंबईत ‘जी-दक्षिण’ विभागापाठोपाठ भायखळा, नागपाडा, चिंचपोकळी या ‘ई’ विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. या विभागात आतापर्यंत १११ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. मात्र, विभागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच आतापर्यंत दोन सहायक आयुक्तांच्या बदल्या आयुक्तांनी केल्या आहे. महापालिकेत सहायक आयुक्त पदाची परिक्षेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेत उत्तीर्ण होवून पात्र ठरलेल्या उमेदवारांपैकी मृदूला अंडे आणि मकरंद दगडखैर यांचे प्रशिक्षण सुरू होते. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती सहायक आयुक्तपदावर करण्यात आली आहे. अलका ससाणे यांची बदली केल्यानंतर मृदूला अंडे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर ‘डि’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे या विभागाचा भार सोपवण्यात आला. मात्र, तीनच दिवसांमध्ये अंडे यांची बदली करून त्यांच्या जागी मकरंद दगडखैर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गायकवाड यांच्याकडे ‘डि’ विभागासह बाजार विभागाचा संयुक्त पदभार होता. त्यामुळे गायकवाड यांच्याकडील तो पदभार काढून अंडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

मात्र, आयुक्तांनी पुन्हा एकदा नवख्या अधिकाऱ्याचीच वर्णी लावलेली आहे. मुंबई महापालिकेत अनुभवी असलेल्या केशव उबाळे हे सध्या मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त आहेत. सध्या या विभागाला कोणतेही काम नाही. त्यामुळे ‘ई विभागाला अनुभवी आणि सक्षम सहायक आयुक्त म्हणून केशव उबाळेच्या माध्यमातून देणे आवश्यक असताना आयुक्त या अधिकाऱ्याच्या नावाचा  विचार करताना दिसत नाही. उबाळे यांची ‘ई’ विभागाच्या सहायक आयुक्तपदावर नियुक्ती केल्यास त्यांच्या अनुभवाचा फायदा विभागाला होईलच, शिवाय ‘डि’ विभागाच्या प्रशांत गायकवाड यांनाही इथे लक्ष न देता स्वत:च्या विभागावर अधिक लक्ष देणे सोयीचे ठरेल.


हेही वाचा – CoronaVirus: शुश्रूषा हॉस्पिटलमधल्या २ डॉक्टर्स आणि ६ नर्सेसना कोरोनाची लागण!


First Published on: April 13, 2020 12:26 AM
Exit mobile version