मुंबई महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनात प्रथम क्रमांक

मुंबई महापालिकेला घनकचरा व्यवस्थापनात प्रथम क्रमांक

केंद्र शासनातर्फे पार पडलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेमध्ये, चाळीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या श्रेणीत, घनकचरा व्यवस्थापनातील ‘नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरी’ साठी मुंबई महापालिकेला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार लाभला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी घनकचरा व्यवस्थापन खात्याचे अभिनंदन केले आहे.

नवी दिल्ली मध्ये विज्ञान भवन येथे शनिवारी पुरस्कार वितरण समारंभात, गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी हा पुरस्कार प्रदान केला. मुंबई महापालिकेच्या उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) संगीता हसनाळे, उपायुक्त (परिमंडळ ७) श्रीमती भाग्यश्री कापसे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) अशोक यमगर, कार्यकारी अभियंता (स्वच्छ भारत अभियान) अनघा पडियार यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याकडून दर वर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा आयोजित करण्यात येते. यंदा सन २०२१ च्या स्पर्धेत, ४० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांच्या श्रेणीमध्ये मुंबई महापालिकेने प्रथम क्रमांक मिळवून एक वेगळा ठसा उमटवला आहे.

घनकचरा व्यवस्थापनात मुंबई अग्रेसर

मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानीचे शहर आहे. या मुंबईत देशाच्या कानाकोपऱ्यामधून लोक नोकरी, काम, धंद्यासाठी, उद्योग, व्यवसायासाठी येत असतात. मुंबईत ६०% झोपडपट्टी परिसर आहे. मुंबईची लोकसंख्या १ कोटी ७० लाखांवर गेली आहे. मुंबईत दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. तसेच, मुंबईत दररोज विविध कारणास्तव अंदाजे ४० लाखांपेक्षाही जास्त लोक ये – जा करीत असतात. त्यांच्या खाण्यापिण्यासह प्रसाधनगृह, कचरा टाकण्याची व्यवस्था आदी सर्व प्रकारच्या सेवसुविधा मुंबईत उपलब्ध असते.

दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर असते. वार्षिक सरासरी ६ हजार १०० मेट्रिक टन घनकचऱ्याचे व्यवस्थापन मुंबईत केले जाते. हे व्यवस्थापन अधिकाधिक सुलभ आणि पर्यावरणस्नेही व्हावे म्हणून महानगरपालिकेने अनेक पावले उचलली आहेत. तसेच मोठ्या प्रमाणावर जनजागृती करून लोकसहभाग देखील वाढवला आहे. या सर्व कामगिरीची दखल घेऊन महापालिकेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

 

First Published on: November 20, 2021 10:34 PM
Exit mobile version