मुंबई महानगर पालिकेत मनसेला प्रवेशबंदी, पत्रकार परिषद घेण्यापासून रोखलं!

मुंबई महानगर पालिकेत मनसेला प्रवेशबंदी, पत्रकार परिषद घेण्यापासून रोखलं!

मुंबई महानगर पालिका पत्रकार कक्ष

निवडणुका जसजशा जवळ येत चालल्या आहेत, तसतसे सर्वच राजकीय पक्ष सतर्क होऊ लागले आहेत. अनेक मुद्द्यांवर रान उठवून विरोधी उमेदवाराला किंवा पक्षाला नामोहरम करण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महानगर पालिकेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्या पत्रकार परिषदेला परवानगी नाकारल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये संदीप देशपांडे एका आरक्षित भूखंडाबाबत मनसेची भूमिका मांडणार होते. मात्र, पालिका प्रशासनाकडून अप्रत्यक्षरीत्या या पत्रकार परिषदेलाच खोडा घालण्यात आला आहे.

पत्रकार कक्षाला ठोकलं टाळं!

गुरुवारी दुपारी २.३०च्या सुमारास संदीप देशपांडे मुंबई महानगर पालिकेच्या पत्रकार कक्षात पत्रकार परिषद घेणार होते. त्यासाठी ठरलेल्या वेळेनुसार ते पालिकेत पोहोचले देखील. मात्र, ऐनवेळी त्यांना कळलं की पालिकेच्या जनसंपर्क विभागाने पालिकेच्या पत्रकार कक्षाला टाळं ठोकलं आहे. यासंदर्भात विचारणा केली असता पत्रकार परिषदेला परवानही नसल्याचं कारण देण्यात आलं. विशेष म्हणजे संबंधित जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ‘वरून आदेश आल्यामुळे पत्रकार कक्षात कुणालाही प्रवेश देणार नाही’ असे संदीप देशपांडे यांना सांगितलं.

शिवसेना मनसेला घाबरली?

दरम्यान, मनसेच्या पत्रकार परिषदेला घाबरुनच शिवसेनेनं पालिकेच्या पत्रकार कक्षाला टाळं लावल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याशिवाय पालिकेच्या प्रवेश द्वारावर सुरक्षा वाढवल्यामुळे अनेक प्रकारचे तर्क-वितर्क लढवले जाऊ लागले आहेत.


तुम्ही हे वाचलंत का? – निरुपमांना परप्रांतियांचा पुळका; मनसेने दिला दणका

First Published on: October 11, 2018 3:24 PM
Exit mobile version